पाण्यासाठी विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
तालुक्यातील कन्नूरसह 14 गावातील ग्रामस्थांचा सहभाग : अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर/विजापूर
तालुक्यातील कन्नूर, मडसनाळ, कन्नूर दर्गा, कन्नूर तांडा, कन्नाळ, गुणकी, बोम्मनहळी, मिंचनाळ आणि मिंचनाळ तांडा, शिरनाळ, मखणापूर आणि मखणापूर तांडा, तिडगुंडी आणि डोमनाळ या सर्व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी तलाव भरणे तसेच रेणुका सिद्धेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी जॅकवेल बांधण्याची मागणी अनेकवेळा संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे केली गेली. मात्र अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान वरील सर्व गावांना समग्र जलसिंचन सुविधा द्यावी, या मागणीचे निवेदन विजापूर जिल्हाधिकारी आनंद के. यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी आमरण उपोषण आणि भव्य निषेध रॅली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली आणि तेथे सभेत रुपांतर झाले. रॅली दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कन्नूर गुरुमठाचे सोमनाथ शिवाचार्य म्हणाले, आमचे शेतकरी अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर काहीही कारवाई केलेली नाही.
रेणुकासिद्धेश्वर पाणीपुरवठा योजना सुरू करताना कन्नूर, मडसनाळसह 14 गावांना पाण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी होती. काही आमदारांनी त्यांच्या भागाला सुविधा मिळवून दिली आहे त्याबरोबरच आमच्यालाही सुविधा द्याव्यात. अनेक शेतकऱ्यांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. या योजनेत आम्हाला जॅकवेल दिल्यासच आम्ही सहकार्य करू, अन्यथा ही योजना आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सतीश पाटील यांनी सांगितले, कन्नूर, मडसनाळसह 14 गावांसाठी रेणुकासिद्धेश्वर योजनेत तीन जॅकवेल गरजेचे आहेत. ही योजना 2638 कोटी रुपयांची असून तीन टप्प्यात (पहिला टप्पा-760 कोटी, दुसरा टप्पा-939 कोटी) राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जॅकवेल, तांत्रिक यंत्रणा आणि सर्वे करणे अपेक्षित आहे. या नकाशात कन्नूरच्या कोणत्याही भागात जॅकवेल न दिल्यामुळे हा भाग कायमचा सिंचनाविना राहून जाईल, ही आम्हाला भीती आहे. त्यामुळेच आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता.