मतदानाचा हक्क वाचविण्यासाठी मतचोरीविरुद्ध आंदोलन
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे स्पष्टीकरण : दिल्लीत पत्रकारांशी संवाद
बेंगळूर : देशातील 140 कोटी लोकांचा मतदानाचा हक्क वाचविण्यासाठी आम्ही मतचोरीविरुद्ध आंदोलन छेडत आहोत. यात कोणताही राजकीय हेतू नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. रविवारी दिल्लीतील कर्नाटक भवन येथे पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. मतचोरीविरुद्धच्या आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही बेंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे मतचोरीविरुद्धच्या आंदोलनाला सुरुवात केली. आता आम्ही रामलीला मैदानावर आंदोलन करत आहोत.
या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत, असा संदेश दिला जात आहे. देशातील निवडणुका आता निष्पक्ष नाहीत. मतचोरी केल्याची हजारो उदाहरणे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत या मुद्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी अनेकवेळा मीडिया कॉन्फरन्सद्वारे कागदपत्रे उघडकीस केली आहेत. तथापि, आम्हाला निवडणूक आयोगाकडून योग्य उत्तर मिळत नाही. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून संवैधानिक संस्थांच्या गैरवापराबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी लढत आहोत, असेही शिवकुमार म्हणाले.
राज्यातील 4,000 कार्यकर्ते सहभागी
दिल्लीतील आंदोलनासाठी राज्यातून येणाऱ्या 1,500 कार्यकर्त्यांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था केली आहे. 2000 हून अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वत:ची व्यवस्था केली आहे. काहीजण विमानाने तर काहीजण रेल्वेने दिल्लीत आले आहेत. सुमारे 3,500 ते 4,000 लोक आंदोलन करण्यासाठी दाखल झाले आहेत. राज्यात मतचोरीच्या गैरप्रकाराविऊद्ध स्वाक्षरी मोहिमेत 1.42 कोटी स्वाक्षऱ्या गोळा झाल्या आहेत. येथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनच्या उत्साहाचे प्रतीक आहेत. येथे असलेले सर्वजण देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाला वाचवण्यासाठी आणि मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.