चिनी नागरिकांची सुरक्षा करू ः पाकिस्तानचे पंतप्रधान
बीएलएच्या संशयित महिला आत्मघाती हल्लेखोराला अटक
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनच्या पंतप्रधानांशी फोनवरून संवाद साधला आहे. चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करू, कायदा-सुव्यवस्था सुधारण्यात येईल असे आश्वासन शरीफ यांनी चीनच्या पंतप्रधानांना दिले आहे. या चर्चेदरम्यान शाहबाज यांनी सीपीईसीचा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेच्या काही तासांनीच पाकिस्तानी पोलिसांनी एका संशयित महिला आत्मघाती हल्लेखोराला अटक केली आहे.
संबंधित महिलेकडून स्फोटके आणि बॉम्बनिर्मितीची सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. संशयित महिला ही बलूच लिबरेशन आर्मीची सदस्य आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरनजीक हल्ला करण्याची आणि चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याची जबाबदारी या महिलेला देण्यात आली होती असा दावा पोलिसांनी केला आहे.
कराची विद्यापीठात 26 एप्रिल रोजी महिलेने घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात 3 चिनी प्राध्यापकांना जीव गमवावा लागला होता. चीनने या घटनेनंतर पाकिस्तानला चिनी नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची ताकीद दिली होती. तर हल्ल्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ मध्यरात्री इस्लामाबादमधील चिनी दूतावासात पोहोचले होते.
चिनी नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांमुळे नाराज ड्रगनने पाकिस्तानात कार्यरत स्वतःच्या सर्व प्राध्यापकांना मायदेशी बोलाविले होते. या आदेशामुळे कराची विद्यापीठासह पूर्ण पाकिस्तानात मँडरिन शिकविणारे प्राध्यापक मायदेशी परतले होते.