अहमदाबादमध्ये 2030 च्या राष्ट्रकुलचे आयोजन करण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारतातील एका शिष्टमंडळाने 2030 राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव औपचारिकपणे लंडनमध्ये राष्ट्रकुल क्रीडा मूल्यांकन समितीसमोर सादर केल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व गुजरातचे क्रीडामंत्री हर्ष संघवी आणि भारतीय ऑलिंपिक असोसिएशन (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा यांनी केले.
2030 च्या आवृत्तीला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण राष्ट्रकुल क्रीडा चळवळीला त्यावेळी 100 वर्षे होतात आणि भारताने या 100 व्या आवृत्तीसाठी यजमान शहर म्हणून अहमदाबादला निवडले आहे, असे गुजरात सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अहमदाबादमध्ये या खेळांच्या आयोजनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाची ठिकाणे, मजबूत वाहतूक व्यवस्था आणि उच्च दर्जाची निवासस्थाने अशा उपयुक्त सुविधा आहेत, असे त्यात म्हटले आहे.
‘गेम्स रीसेट’ तत्त्वांशी सुसंगत हा प्रस्ताव परवडण्याजोग्या बाबी, समावेशकता, लवचिकता आणि शाश्वततेवर जोरदार भर देतो. पॅरा-स्पोर्ट्सचे एकत्रीकरण, मानवी हक्कांचे संरक्षण, लिंग समानतेला प्रोत्साहन आणि दीर्घकालीन वारसा चौकटीचा अंतर्भाव करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. यातून क्रीडास्पर्धेच्या पलीकडे जाऊन खेळाडू, समुदाय आणि राष्ट्रकुलला फायदे मिळतील, असे त्यात म्हटले आहे.
अहमदाबादमध्ये 100 व्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करणे हा केवळ गुजरातसाठीच नाही, तर भारतासाठी एक अभिमानास्पद टप्पा असेल. आम्ही या खेळांकडे आमच्या तऊणांना प्रेरणा देण्यासाठी, विकसित भारत 2047 च्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठी आणि पुढील 100 वर्षांतील राष्ट्रकुल चळवळीला बळकटी देण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून पाहतो, असे मंत्री संघवी म्हणाले.
‘भारताची मागणी केवळ क्षमतेबद्दल नाही, तर मूल्यांबद्दल आहे. अहमदाबाद 2026 च्या ग्लासगो गेम्समधून बॅटन उचलण्यास आणि 2034 च्या खेळांसाठी एक स्प्रिंगबोर्ड म्हणून वावरण्यास तयार आहे. 100 व्या आवृत्तीतून राष्ट्रकुल खेळांच्या भविष्याला आकार देताना भूतकाळाचाही सन्मान करण्यात येईल, असे उषा यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भारत सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय राष्ट्रकुल क्रीडा संघटना यांच्या मजबूत पाठिंब्यासह हा प्रस्ताव जागतिक स्तरावर प्रभाव टाकणाऱ्या क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेवरही प्रकाश टाकतो, असे त्यात म्हटले आहे.