मनपा मुख्य सभागृहाच्या रिन्युव्हेशनचा प्रस्ताव
बेळगाव : महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहाचे रिन्युव्हेशन करण्याचा प्रस्ताव कौन्सिल विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, सदर प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेवेळी सभागृहात एका उंदराने प्रवेश केल्यामुळे सभागृहाच्या रिन्युव्हेशनचा विषय चर्चेत आला आहे. रिसालदार गल्लीतील महानगरपालिकेची इमारत जीर्ण झाल्याने सुभाषनगर येथे नवीन इमारत बांधण्यात आली. त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेचे कामकाज सुरू आहे. महापालिकेची इमारत नवी असली तरी तेथील काही साहित्य मात्र जुनेच आहे. अत्याधुनिक पद्धतीने सभागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे, पण तेथील आसन व्यवस्था जुनी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सभागृहाचे एकदाही रिन्युव्हेशन केलेले नाही. सभागृहाच्या व्यासपीठावरील महात्मा गांधीजींच्या फोटोवरील काही भाग गळती लागून पडण्याचा धोका आहे. त्यातच बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेवेळी एका उंदराने प्रवेश केला. महापौर, उपमहापौरांच्या टेबलाखाली जाऊन मनपा आयुक्तांच्या टेबलखाली उंदीर विसावला. या प्रकारामुळे भर सभेत हश्श्या पिकला. तसेच सभागृहाच्या रिन्युव्हेशनबद्दल चर्चा ऐकावयास मिळाली. यापूर्वीच कौन्सिल विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सभागृहाच्या रिन्युव्हेशनचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पण त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समजते.