राज्य महामार्गांवर चार्जिंग स्टेशनचा प्रस्ताव
बेस्कॉमकडून जत-जांबोटी महामार्गाचाही समावेश : एकूण 30 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार
बेळगाव : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने बेस्कॉमकडून चार्जिंग स्टेशन सुरू केली जाणार आहेत. राज्य महामार्गांवर ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंट उभे केले जाणार आहेत. कर्नाटक रोड डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरडीसीएल)च्या सहकार्याने चार्जिंग स्टेशन बेस्कॉम उभारणार आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातून जाणाऱ्या जत-जांबोटी या आंतरराज्य महामार्गाचा समावेश आहे. बेस्कॉमकडून एकूण 30 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. सध्या बेंगळूर शहर परिसरात 209 ईव्ही स्टेशन बेस्कॉमकडून चालविले जातात. याच धर्तीवर आंतरराज्य महामार्गावर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत.
यासाठी केआरडीसीएलकडे परवानगीचे पत्र पाठविण्यात आले आहे. मागील पाच-सहा वर्षांत इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. त्यातच आता कमर्शियल वाहनेही येऊ लागल्याने ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासू लागली आहे. महामार्गांवरून दूरवरचा प्रवास करताना चार्जिंग स्टेशन गरजेचे ठरत आहे. सध्या असलेल्या काही पेट्रोलपंपावर ज्या प्रकारे सीएनजीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचप्रकारे चार्जिंग स्टेशनचीही व्यवस्था व्हावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत होती. कर्नाटकात अनेक प्राचीन मंदिरे, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे असल्यामुळे चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासू लागली आहे.
पुणे-बेंगळूर महामार्गावर 10 ठिकाणी चार्जिंग स्टेशन
बेस्कॉम भविष्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावरही चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा विचार करत आहे. पुणे-बेंगळूर महामार्गावर 10 टोलनाक्यांवर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रस्ताव असून तो अंतिम टप्प्यात असल्याचेही बेस्कॉमकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत याबाबतची चर्चा सुरू आहे. देशात सर्वाधिक म्हणजे 5960 चार्जिंग स्टेशन कर्नाटकात असून त्यापैकी 4656 खासगी आहेत.
बेळगाव जिल्ह्याला होणार फायदा...
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यापासून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जांबोटी या गावाला जोडणाऱ्या राज्य महामार्ग 31 वरदेखील चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगाव तालुक्यासह अथणी, गोकाक या तालुक्यांनाही चार्जिंग स्टेशन मिळण्याची शक्यता आहे.