तुयेत भरदिवसा घर फोडून 4 लाखांचा ऐवज लंपास
पेडणे : तुये-पार्से या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनिल श्रीधर सावंत यांच्या घरात काल मंगळवारी भर दिवसा चोरी झाली असून चोरट्यांनी तीन सोनसाखळ्या, सोन्याचे पान, मिलेरमधील रोख रक्कम सुमारे 15 हजार तसेच तिजोरीत असलेले 35 हजार ऊपये असा सुमारे चार लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरात कोणी नसल्याचा चोरट्याने फायदा उठवत ही चोरी सकाळी साडेदहाच्या दरम्यान केली असल्याचा पोलिसांचा कयास आहे. घरातील अनिल श्रीधर सावंत हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तसेच पत्नीही घरी नव्हती. मुलगी कॉलेजला गेली होती आणि मुलगा कामाला गेला होता. या संधीचा फायदा उठवत बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटात असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तसेच मिलेरमधील पैसे चोरट्याने लंपास केले. घरी आल्यानंतर अनिल सावंत यांच्या निदर्शनास आले की दाराची कडी तोडून चोरी करण्यात आली आहे.
त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पेडणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. चोरीचा पंचनामा उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी केला असून निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढील तपास करत आहेत. पेडणे पोलिसांनी श्वान पथकाला प्राचारण केले. तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पेडणे पोलीस पुढील तपास करीत आहेत. माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य निलेश कांदोळकर यांनी सांगितले की, या भागात मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय कामगार राहतात. त्यांच्याकडे कोणेतही ओळखपत्र किंवा आवश्यक दस्तावेज नसतो. दिवसाढवळ्या घर फोडून चोरी करून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरणे ही चिंतेची बाब असून अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. जे कोणी आपल्या घरात भाडेकरू ठेवत आहेत त्यांनी दक्षता घेण्याची तसेच त्यांची ओळखपत्रे घेण्याची गरज आहे. बिगर गोमंतकीय भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. पेडणे पोलिसांनी या घटनेतील चोरांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी कांदोळकर यांनी केली आहे.