माजी सैनिकाच्या बंगल्यातील 28 लाखांचा ऐवज लंपास
निपाणीच्या अष्टविनायकनगरातील घटनेने खळबळ
निपाणी : निपाणी येथील अष्टविनायकनगर येथे चोरट्यांनी माजी सैनिकाचा बंद बंगला फोडून सुमारे 28 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आली. राजू कृष्णा घाटगे असे चोरी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. माजी सैनिक राजू घाटगे हे मंगळवारी इस्लामपूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश केला. तिजोरीतील साहित्य विस्कटले व जवळपास 22 तोळे सोने, अर्धा किलो चांदी, तसेच 25 हजाराची रोकड असा एकूण 28 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. माजी सैनिक राजू घाटगे हे बुधवारी दुपारी अडीच वाजता आल्यानंतर त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा दिसला.
बंगल्यात प्रवेश केल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार सीपीआय बी. एस. तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर अष्टविनायकनगर परिसरात विद्युत खांबावर दिवे नसल्याने येथे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेला कळवूनदेखील नगरपालिका दुर्लक्ष करत आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे. निपाणी शहरात वारंवार चोरीच्या घटना होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांसमोर चोरट्यांचा तपास करण्याचे आव्हान ठाकले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.