चोरट्यांकडून 10.52 लाखांचा ऐवज जप्त
आलमेल येथील घरफोडी प्रकरणातील दोघांना अटक : दागिन्यांसह दुचाकीही हस्तगत
वार्ताहर/विजापूर
विजापूर जिह्यातील आलमेल शहरात अलिकडेच अनेक घरेफोडींचे गुन्हे नोंदवले गेले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत त्या संदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे रु. 10 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देवरहिप्परगी तालुक्यातील चिक्करुगी गावचे रहिवासी शरणबसू महादेव जाळवाड (वय 31) आणि प्रकाश निंगप्पा कांबळे (वय 21) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चोरट्यांकडून 86 ग्रॅम सोन्याचे दागिने - सुमारे रु 8.60 लाख रुपये, 67 ग्रॅम चांदीचे दागिने - सुमारे रु. 67 हजार रुपये, 5 मोटारसायकल्स (गुह्यासाठी वापरलेले) - सुमारे रु 1.25 लाख रुपये असा एकूण अंदाजे रु 10.52 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले आहे. या कारवाईत जिल्हा पोलीस उपायुक्त रामनगौडा हट्टी, जगदीश एच.एस., नानगौडा पोलीस पाटील, अरविंद अंगडी, एस. एम. पडशेट्टी तसेच पोलीस कर्मचारी एच. टी. गोडेकर, सलीम सवदी, सिद्राम पाटील, एस. बी. यत्नाळ, व्ही. एस. आळूर, एस. एस. जाळगेरी, बी. एस. मेदेदार, बी. जी. क्षत्री यांनी सहभाग घेतला होता.