कोराणेंकडून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी
कोल्हापूर :
मटकाबुकी सम्राट कोराणे याने फरार काळात पत्नीच्या नावे साळशिरंबे (ता. कराड, जि. सातारा) येथे पाच एकर शेतजमिन तर नागाळा पार्क येथे अलिशान फ्लॅटची खरेदी केल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. याचबरोबर सम्राटला फरार काळात उत्तम मोरे, विजेंद्र कोराणे यांनी 16 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक रसद पुरविली आहे. यासर्व आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी सरकारी वकिल अॅङ अमित महाडेश्वर यांनी मंगळवारी न्यायालयात केली. त्यानुसार दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत 25 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.
यावेळी सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी गेल्या 12 दिवसांतील तपासाची प्रगती न्यायालयात सादर केली. फरार काळात कोराणे याने पत्नीच्या नावे साळशिरंबे येथे 5 एकर शेतजमीन खरेदी केली आहे. तसेच कोल्हापूरातील नागाळा पार्क येथे 2 बीएचकेचा अलिशना फ्लॅट खरेदी केल्याची माहिती न्यायालयात सादर केली. या व्यवहारांसाठी त्याने रोकड कोठून उपलब्ध केली याचा तपास करायचा आहे. तसेच हवाला आणि अंगडीयाच्या माध्यमातून या गुह्यातील काही आरोपींना सम्राटने 50 ते 60 लाख रुपयांची आर्थिक रसद पुरविली आहे. या दोनही आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी अजून पोलिस कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद अॅङ महाडेश्वर यांनी केला. फरार काळात कोराणे अनेकांच्या संपर्कात होता. यासाठी त्याने कोणाच्या नावावर मोबाइल सिम घेतले? आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी कोणाच्या बँक खात्यांचा वापर केला? रोख स्वरूपात कोणी मदत केली? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.त्यानुसार न्यायाधीश कश्यप यांनी कोराणे याच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ केली.
- दोघांकडून सम्राटला साडेसोळा लाखांची आर्थिक रसद
सम्राट कोराणेला मदत करणाऱ्या उत्तम मोरे, विजेंद्र कोराणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी गेल्या चार वर्षांत कोराणेला 16 लाख 50 हजार रुपये पाठवले आहेत. ही रक्कम या दोघांना कोणाकडून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तसेच ही रक्कम काही मित्रांच्या खात्यावर पाठविण्यात आली आहे, याचा तपशिलाबाबत अजूनही माहिती दिली नसल्याचे अॅङ महाडेश्वर यांनी सांगितले.
- सम्राटच्या घरात नोटबंदी काळातील चलन
- चार दिवसांपूर्वी सम्राट कोराणे याच्या शिवाजी पेठ येथील घरावर पोलीसांनी छापा टाकला होता. यादरम्यान 68 हजार 800 रुपयांची रोकड जप्त केली होती. ही रक्कम नोटबंदी काळातील आहे. यामध्ये 2 हजार आणि जुन्या 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच अजून दोन ते तीन मालमत्तांबाबत माहितीही समोर आली आहे.
- फरार काळात कोट्यावधींची मालमत्ता खरेदी
गुन्हा दाखल झाल्यानंतर सम्राट फरार होता. 2019 ते 2025 या काळात त्याने साळशिरंबे (कराड, सातारा) जवळ 5 एकर जमीन, तसेच नागाळा पार्क येथे 2 बीएचके फ्लॅट पत्नीच्या नावाने खरेदी केली आहे. या व्यवहारासाठी पत्नीकडे एवढी रक्कम आली कोठून याचा तपास पोलिसांना करायचा आहे. ही रक्कम पुरविण्यामध्ये हवाला किंवा अंगडीयाचा वापर करण्यात आला आहे काय याचीही चौकशी होणे अद्याप बाकी आहे. फरार काळात कोराणेचे अवैध धंदे बंद होते. तसेच त्याची बँक खातीही गोठवण्यात आली होती. मात्र तरीही त्याने कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता कशा खरेदी केल्या.
- अंगडीया, हवालाद्वारे पैशाचे व्यवहार
सम्राट कोराणे फरार काळात मुंबई आणि पुणे येथे वास्तव्यास होता. या काळात तो ओळख लपवून राहिला काय याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या काळात त्याने याच गुह्यातील काही आरोपींना मदत केली आहे. त्यांना आर्थिक पाठबळही दिले आहे. हे सर्व व्यवहार अंगडीया आणि हवालाच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आली आहे.