कोटीतीर्थ, यादवनगर झोपडपट्टीधारकांना 15 दिवसात प्रॉपर्टी कार्ड द्या : राजेश क्षीरसागर यांची सूचना
शहरातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
शहरातील 64 झोपडपट्टयांपैकी 11 ठिकाणी प्राधान्याने प्रॉपर्टी कार्ड वितरणाचे काम सुरू आहे. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम गतीने करा. कोटीतीर्थ, यादवनगर वसाहतीमधील झोपडपट्टीधारकांना 15 दिवसांत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा व महापालिका प्रशासनाला दिल्या. तसेच संकपाळ नगर, माळी कॉलनी येथील रस्ते आणि मोकळ्या जागेबाबत शिथीलता देणे आवश्यक असून याबाबत संचालक नगर रचना पुणे यांना दूरध्वनीद्वारे त्यांनी आवश्यक सूचना केल्या.
शहरातील विविध प्रश्नांबाबत गुरुवारी राजेश क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली यामध्ये त्यांनी झोपडपट्टीधारकांना पॉपर्टीकार्ड देण्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी त्यांनी बोंद्रेनगर झोपडपट्टी, संकपाळनगर झोपडपट्टी, दत्त मंदिर (कागलकर जमिनीजवळ) कसबा बावडा, वारे वसाहत (संभाजीनगर), देसाई बंगला जवळ, माळी कॉलनीम टाकाळा, कामगार चाळ, शेंडा पार्क (लेपरसी कॉलनी) स्वाधारनगर, झोपडपट्टी येथील कामांबाबतही या बैठकीत आढावा झाला. यावेळी क्षीरसागर यांनी याबात स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांना तयार करा, शासनाच्या मदतीचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या. राजाराम बंधाऱ्यावरील पुलासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत यावेळी चर्चा झाली. मोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पुढील पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी नियोजन केले जाईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. रंकाळा येथील अमृत योजनेचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी मनपा प्रशासनाला दिले.
बैठकीला मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, जलअभियंता हर्षजीत घाटगे, प्रधानमंत्री आवास योजनेचे युवराज जबडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, जिल्हा सहआयुक्त नगर विकास नागेंद्र मुतकेकर आदी उपस्थित होते.