For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योग्य शिक्षण

06:50 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
योग्य शिक्षण
Advertisement

एकदा एका जंगलात ससा आणि कासव दोन मित्र राहत होते. दोघांची खूप छान मैत्री होती. खेळायचे, बागडायचे, खायचे, लोळायचे. अशा रोज त्यांच्या गंमती जमती चालायच्या. एक दिवस का कुणास ठाऊक ससा म्हणाला ‘आपण काहीतरी वेगळा खेळ खेळूया’. ‘मी पळेन तू मला पकडायला ये’ किंवा त्या डोंगरावरच्या उंच झाडापर्यंत पळण्याची शर्यत लावूया. खरंतर कासवाच्या अजिबात मनात नव्हतं. तो म्हणाला आपण पळण्यापेक्षा चालण्याची शर्यत लावूया! पण ससा काही केल्या तयारच होईना. शेवटी हो-नाही करता करता ससा तयार झाला. आणि दुसऱ्या दिवशी दोघेही स्पर्धेला तयार झाले. बाकी आपण लहानपणी गोष्ट वाचली त्याप्रमाणे घडत गेलं. जाताना कासवाने ससा झोपला हे पाहिलं. म्हणजे आता आपला पहिला नंबर निश्चित या आनंदात तो जरा पटापटा चालायला लागला. डोंगरावर जाऊन पाहतो तर काय वरती ससा उड्या मारत होता ‘मीच पहिला आलो ...माझा पहिला नंबर......’ असं म्हणत तो सगळ्यांना सांगत होता. कासवाला काही हे पटेना. हुशार कासवाने सशाचा व्हिडिओ काढला, जो अजून झोपलाय त्याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेतच असं म्हणून कासवाने परीक्षकांना सगळी गोष्ट दाखवली. परीक्षकांनाही आश्चर्य वाटलं की असं असेल तर हा ससा पहिला कसा आला? मग त्यांनी काहीतरी विचारविनिमय केला आणि पहिल्या आलेल्या सशाला सांगितलं. ‘पळत जा आणि तुझ्या घरच्या सगळ्या लोकांना बोलव. तुमचा सगळ्यांचा सत्कार करूया’. या आमंत्रणाने सशाला कोण आनंद झाला. तो गेला आणि घरच्या सगळ्यांना घेऊन आला. सगळेजण नटून थटून आले होते. सशाच्या आईच्या मागे मात्र कुणीतरी लपछपत येत होतं. मग परीक्षकांच्या एकदम लक्षात आलं की हा लपणारा जो आहे तो ह्या सशाचा जुळा भाऊ असावा. त्यांनी सहज बोलता बोलता सशाच्या आईला हे विचारलं आणि मग परीक्षकांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी त्या दोन्हीही सशांना जवळ बोलावलं. शाब्बासकी दिली आणि सांगितलं की तुम्ही नेमकं काय केलं ते सांगा बरं. मग मात्र सशांना लाज वाटू लागली.

Advertisement

स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच सशाने आपल्या जुळ्या भावाला आधीच स्पर्धा संपायच्या ठिकाणी नेऊन उभं केलं होतं आणि स्पर्धा सुरू व्हायच्या आधी मोबाईल वरून त्याला कळवलं होतं. म्हणजे कासव जवळपास येताना दिसलं की तू तिथे त्याच्या पुढे पळायला लागायचं. अशा प्रकारे हा विजय मिळवल्यामुळे दोघांनाही  मनातून लाज वाटली. शेवटी त्यांनी खाली मान घालून तिथून धूम ठोकली. पहिलं मिळालेलं बक्षीसही घेतलं नाही. आता काय करायचं? पण कासव चांगला मित्र होता. त्यांनी ते आपल्याकडे घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला दिलं.  कारण कासवाला माहिती होतं की आपण दोघेही उत्तम मित्र आहोत. मैत्रीमध्ये अशा बक्षिसामुळे वाईटपणा यायला नको. कासवाच्या हेही लक्षात आलं की आपण जी चालण्याची स्पर्धा म्हणत होतो ती ससा का नको म्हणाला असेल. ते दोघे जंगलात खेळायचे, जेंव्हा नदीतून जायचं असेल किंवा जवळपास हळूहळू कुठे जायचं असेल तर सशाला चालता यायचं नाही. त्यावेळी सशाला कासवराव पाठीवर  घ्यायचे. आणि वर दूर उंच कुठेतरी डोंगरावर जायचं असेल तेव्हा कासवाला वर ओढून घ्यायचं काम ससा करायचा. दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचे पण सशाला चालता येत नाही, याबद्दल कधीही कासवाने तक्रार केली नाही. सशाला का बरं चालता येत नाही? माहिती आहे का? सशाचे मागचे पाय छोटे आणि पुढचे मोठे. दोन्हीही कमी जास्त असल्यामुळे सशाला पळतच चालायला लागतं, ही गोष्ट कासवाच्या ध्यानात आल्यामुळे कासवाने पुन्हा कधीही त्याला चालण्याचा आग्रह केला नाही आणि पळण्याच्या शर्यतीतही भाग घेतला नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.