बायोडिझेल वापरास चालना
तालुका स्तरावर इंधन पंप उभारणार
बेंगळूर : पर्यावरणपूरक उर्जेला चालना देण्यासाठी कर्नाटक राज्य बायो एनर्जी विकास मंडळाने तालुका स्तरावर बायोडिझेल पंप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे पंप खासगी कंपन्यांच्या भागीदारीत उभारले जातील. या पंपाचे संचालन खासगी कंपन्या करतील. तर मंडळ त्यांना सरकारकडून आवश्यक परवाने मिळवून देण्यासाठी आणि इंधन बाजारात आणण्यासाठी मदत करणार आहे. बायोडिझेल हे वापरलेल्या खाद्यतेल, तेलबिया, भाताचे तूस यासारख्या कृषी अवशेषांपासून तयार केले जाते. राज्यात सध्या बायोडिझेलचा मोठा साठा असून, याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकताच ‘कर्नाटक स्टेट बायोडिझेल (बी-100) ब्लेंडिंग विथ हाय स्पीड डिझेल फॉर ट्रान्सपोर्टेशन पर्पज (लायसेन्सिंग) ऑर्डर-2025’ अधिसूचित केला आहे.
यानुसार खासगी कंपन्यांना बायोडिझेल पंप उभारण्याची व विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक कंपन्या पंप उभारण्यास तयार होत्या, परंतु, प्रक्रियात्मक अडचणी होत्या. आता या अडचणी अधिसूचनेमुळे दूर झाल्या आहेत, असे बायो-एनर्जी विकास मंडळाचे अध्यक्ष एस. ई. सुधेन्द्र यांनी सांगितले. राज्यात बायोडिझेल हे सामान्य डिझेलपेक्षा सुमारे 4 रुपये प्रति लिटरने स्वस्त असून, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ इंधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. बी100 बायोडिझेलमुळे इंजिनचे नुकसान किंवा मायलेजवर कोणताही परिणाम होणार नसून ते सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटक हे 2007-8 मध्ये जैवऊर्जा धोरण स्वीकारणारे पहिल्या राज्यापैकी एक आहे.