महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नोकर भरतीत आश्वासक पाऊल

06:18 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकार शपथबद्ध झालेले असून आगामी काळात सरकार रोजगारावर भर देणार आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतामध्ये नोकर भरतीच्या प्रमाणात आश्वासक वाढ झालीय. विरोधकांकडून याबाबत आवाज उठविला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र भारतात विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, हे स्पष्ट होते आहे. अलीकडेच एका सर्वेक्षणामध्ये या संदर्भातील माहिती पुढे आली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 2024 मध्ये मे मध्ये 11 टक्के इतकी नोकर भरतीत विविध क्षेत्रात वाढ झाली आहे. निर्मिती कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वर्षाच्या आधारावर पाहता 47 टक्के इतके लक्षणीय दिसून आले आहे. म्हणजेच उत्पादन आधारीत कारखान्यांच्या नव्याने उभारणीने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सरकारने उद्योगांच्या वाढीकरिता पीएलआय सारखी सवलत देणारी प्रोत्साहनपर योजना जारी केल्याने अनेक कंपन्यांनी निर्मिती कारखाने उभारायला सुरुवात केलेली आहे. देशातले उद्योग यात तर भाग घेत आहेतच पण विदेशातील कंपन्याही आपले कारखाने येथे उभारत आहेत. होम अप्लायन्सीस आणि इलेक्ट्रिकल कम्पोनंट्स निर्मिती कारखान्यांमधून नोकर भरतीमध्ये 35 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दूरसंचार क्षेत्रातदेखील 9 टक्के नोकर भरती वाढीव दिसली आहे. अलीकडच्या काळामध्ये दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सेवाविस्तारासाठी गुंतवणूक केली आहे. 5 जी तंत्रज्ञान सेवा, क्लाऊड कम्प्युटींग, डाटा सेंटर यामधून उमेदवार भरती केले जात आहेत. काही वर्षापूर्वी आरोग्य संबंधित उद्योग (हेल्थकेअर)मागे पडले होते पण यातही आता सुधारणा दिसून आली असून वर्षाच्या आधारावर 29 टक्के इतकी भरतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. महिन्याच्या स्तरावर पाहता आरोग्य उद्योगांमध्ये 4 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे. यासोबतच रिटेल उद्योगात नोकर भरतीचे प्रमाण 18 टक्के, तेल, वायू व पेट्रेलियम क्षेत्रात 22 टक्के, बांधकाम क्षेत्रात 20 टक्के आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगांमध्ये 20 टक्के भरतीचे प्रमाण वर्षाच्या आधारावर वाढलेले आहे. या सर्व उद्योगातील नोकर भरती ज्या पद्धतीने वर्षभरामध्ये वाढलेली आहे यावरून आगामी काळातही भरतीत वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. असं जरी असलं तरी कृषी संबंधित उद्योगात 16 टक्के नोकर भरती कमी दिसून आली आहे. याच पद्धतीने शिपिंग-मरीन क्षेत्रात 30 टक्के, एफएमसीजी क्षेत्रात 9 टक्के आणि आयात आणि निर्यात विभागामध्ये 16 टक्के इतकी नोकर भरतीमध्ये घसरण पाहायला मिळाली. या नकारात्मक बाबी सोडल्यास इथे आणखी एक महत्त्वाची बाब सांगायची म्हणजे नोकर भरतीमध्ये मेट्रो शहरांपेक्षा टायर-2 शहरांनी आघाडी घेतलेली आहे. या शहरात पायाभूत सुविधांची केलेली सोय त्याचप्रमाणे उत्तम दळणवळण व्यवस्था या पार्श्वभूमीवर टायर-2 शहरांमध्ये नोकर भरतीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. आगामी काळामध्ये टायर-2 शहरांमध्ये निर्मिती क्षेत्रात 29 टक्के, आयटी सॉफ्टवेअर आणि सेवा 17 टक्के, बांधकाम क्षेत्रात 8 टक्के आणि शिक्षण क्षेत्रामध्ये 8 टक्के उमेदवारांची भरती होण्याची शक्यता सांगितली जात आहे. मेट्रो शहरांमध्ये आयटी सॉफ्टवेअर आणि सेवा या क्षेत्राने कुशल उमेदवारांची भरती मोठ्या प्रमाणात करण्यावर भर दिला आहे. या वरील सर्व उद्योगांमध्ये उमेदवारांना मेट्रो शहरांमध्ये 4.83 लाख प्रति वर्ष ते 6.63 लाख प्रति वर्ष याप्रमाणे वेतन मिळते आहे. काहींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे यापेक्षा जास्तही वेतन मिळत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे टायर-2 शहरांमध्ये देखील उमेदवारांना 4.01 लाख ते 5.43 लाख प्रति वर्ष इतके कमीतकमी वेतन मिळत असल्याचेही तज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article