सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही!
बेळगाव अधिवेशनात शेतकरी संघटना होणार आक्रमक : कृषी कायदे मागे घेण्यांबाबत निर्णय नसल्याने संताप
बेळगाव : कर्नाटकात काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काँग्रेस सरकारला सत्तेत बसवले. परंतु, अद्यापपर्यंत कोणतेच आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटना (हरित सेना) अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे. सोमवारी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर माहिती देत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, विद्युत विभागाचे खासगीकरण थांबवावे, त्यांच्या शेतापर्यंत वीज द्यावी, हलगा-मच्छे बायपास रद्द करावा, उसाला योग्य भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधसमोर धरणे धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील आंदोलनामध्ये भाग घेत आहेत. सीमाभागातील ऊस उत्पादकांसह इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोडीहळ्ळी यांनी केले. यावेळी राजू मरवे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.