काँग्रेसकडून आश्वासनांना हरताळ
एसडीपीआय संघटनेचा आरोप, चन्नम्मा चौकात आंदोलन
बेळगाव : अनेक आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय अद्यापही थांबलेले नाहीत. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची त्वरित पूर्तता करावी अन्यथा भविष्यात योग्य धडा शिकविला जाईल, असा इशारा एसडीपीआय संघटनेकडून देण्यात आला आहे. काँग्रेस सरकारविरोधात चन्नम्मा चौकामध्ये आंदोलन करून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. राज्यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताना अल्पसंख्याकांना 2-बी आरक्षण पुन्हा मिळवून देणार, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. द्वेषपूर्ण भाषणांवर लगाम घालण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तेही अद्याप साध्य झालेले नाही. अल्पसंख्याकांबाबत पक्षपाती धोरण अवलंबले जात आहे. सरकारने असे धोरण राबविल्यास याविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येईल. अल्पसंख्याक आमदारांनीही याविरोधात आवाज उठविलेला नाही. केवळ खुर्ची टिकविण्याचे काम अल्पसंख्याक आमदारांकडून सुरू आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास भविष्यात योग्य धडा शिकविण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.