For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृद्धापपेन्शन वाढीचे आश्वासन

06:15 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृद्धापपेन्शन वाढीचे आश्वासन
Advertisement

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण खात्याच्या मंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यातील 50 लाखहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते. त्यात वाढ करण्याविषयी ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. त्यामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनवाढीची मागणी करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लवकरच आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

बेंगळूरमधील रविंद्र कलाक्षेत्र सभागृहात महिला-बालकल्याण, ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण खात्याने आयोजिलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, त्यांचा आदर राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले सामाजिक योगदान लक्षात घेतले पाहिजे. त्यांची कामगिरी युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरावी, असे ते म्हणाले.

2011 च्या जनगणनेनुसार राज्यात सुमारे 57.91 लाख ज्येष्ठ नागरीक आहेत. अलीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. याला कारण म्हणजे मुले विदेशात स्थायिक होणे, वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ शक्य न होणे हे होय. राज्यात 50 लाखांपेक्षा अधिक जणांना वृद्धापपेन्शन दिली जात आहे. ही रक्कम वाढविण्याविषयी अधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सिद्धरामय्या यांनी दिले.

वृद्धाश्रम संस्कृतीविषयी चिंता

वृद्धाश्रमांची संख्या वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. घरांमध्ये अनुकूल वातावरण असून देखील वृद्ध माता-पित्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी संस्कृती थांबविणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कौतुक

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची विनंती केली असता त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या महिलेने (लक्ष्मी हेब्बाळकर) हट्ट न सोडता गृहलक्ष्मी योजना राबविली आहे. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय राहात नाही. वृद्धापपेन्शन वाढविल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचे त्यांच्या दृढनिर्धारावरून दिसून येते, अशा शब्दात मंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.

  ज्येष्ठ नागरिकांना विमा योजनेसाठी कार्यवाही

ज्येष्ठ नागरिकांचा आदर राखण्याबरोबरच त्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारन वचनबद्ध आहे. ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा योजना जारी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन महिला-बालकल्याण, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले.

बेंगळूरमध्ये मंगळवारी जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या कल्याणासाठी अनेक कार्यक्रम राबविले आहेत. त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. राज्यात सध्या 57.91 लाख ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यांच्या कल्याणासाठी खात्याला सरकारने 2024-25 या वर्षात 10.47 कोटी रुपये अनुदान दिले आहे. याद्वारे अनेक लोकप्रिय कार्यक्रम जारी करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

गॅरंटी योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनुकूल

आमच्या सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजना यशस्वी ठरल्या आहेत. गॅरंटी योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अनुकूल होत आहे. वृद्ध महिलांना शक्ती योजनेंतर्गत मोफत बसप्रवास करता येत आहे. ही बाब आनंदाची आहे, असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात विधानपरिषद सदस्य प्रकाश राठोड, खात्याचे सचिव डॉ. शमला इक्बाल, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण खात्याचे संचालक टी. राघवेंद्र, दिव्यांग हक्क अधिनियम विभागाचे राज्य आयुक्त दास सूर्यवंशी, मानसोपचारतज्ञ डॉ. सी. आर. चंद्रशेखर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.