पर्वरी, फर्मागुडी येथे 198 कोटींचे प्रकल्प
मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी केंद्र सरकार देणार निधी
पणजी : राज्य मंत्रिमंडळाच्या काल बुधवारी झालेल्या बैठकीत, केंद्र पुरस्कृत तब्बल 198 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय अन्य एका महत्वपूर्ण निर्णयात घरांच्या कौटुंबिक विभागणीसही मान्यता देण्यात आली. ही प्रक्रिया आता अत्यंत सहजतेने व कोणत्याही अतिरिक्त खर्चाविना करता येणार असून विभागणीकर्त्यास केवळ स्वतंत्र घरपट्टी आणि कचरा कर भरावा लागणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचीही उपस्थिती होती. सदर 198 कोटींतून तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ‘टाऊन स्क्वेअर’ हा प्रकल्प पर्वरीत साकारणार असून त्यावर तब्बल 110 कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहेत. पर्वरीतच सुमारे 24 कोटी ऊपये खर्च करून खाडीचे सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. फर्मागुडीत सुमारे 64 कोटी ऊपये खर्च करून तेथील शिवाजी महाराज किल्ल्यावर संग्रहालय उभारण्यात येणार आहेत.
घरविभागणी प्रक्रिया सुटसुटीत
घरांच्या कौटुंबिक विभागणीसंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी, सदर प्रक्रिया आता सुटसुटीत करण्यात आल्याचे सांगितले. त्यासंबंधी पंचायत संचालनालयाच्या माध्यमातून सर्व पंचायतींसाठी परिपत्रक जारी करण्यात आले असून घरांच्या कौटुंबिक विभागणीची प्रक्रिया सरळ, सुटसुटीत करण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या कुटुंबाने विभागणीसाठी अर्ज दाखल केल्यास संबंधित ग्रामपंचायतीने 15 दिवसांच्या आत प्रमाणपत्र जारी करावे लागणार आहे. तसेच त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. केवळ स्वतंत्र घरपट्टी आणि कचरा कर भरावा लागणार हे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्याने गाठले 100 टक्के साक्षरतेचे लक्ष्य
साक्षरतेच्या बाबतीत गोव्याने 100 टक्के लक्ष्य गाठले असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा आता साक्षरतेच्या बाबतीत देशात आदर्श राज्य ठरणार आहे. या अधिकृत साक्षरता दर्जासंबंधी येत्या 30 मे रोजी गोवा घटकराज्यदिनी अधिकृत घोषणा करण्यात येईल. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे, हे यश शिक्षक, स्वंयसेवी संस्था आणि सरकार यांच्यातील समन्वयाचे फलित आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.