Sangli : तासगावात 200 जणांना प्रतिबंधात्मक नोटीसा !
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संग्राम शेळके यांची कारवाई
तासगाव : नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच तासगाव पोलीसांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने २०० हून अधिक व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या असून, १० तडीपारी प्रस्ताव तयार केले आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली.
ते म्हणाले की निवडणुकांच्या काळात जुन्या वैरामुळे, गट-तट यामुळे राजकीय तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस सतत गस्त बाढवली आहे. शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रे, संवेदनशील वस्ती, पूर्वी गुन्हे घडलेली ठिकाणे याठिकाणी पोलीस पथकांची विशेष देखरेख ठेवण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक शेळके म्हणाले की, निवडणुकीचा काळ संवेदनशील असतो. म्हणूनच गुन्हे प्रतिबंधासाठी जादा खबरदारी घेतली जात आहे. संशयित, सराईत गुन्हेगार, पूर्वी तणाव निर्माण करणारे लोक आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू शकणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले असून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत."
याशिवाय निवडणुकीदरम्यान शांतता भंग करणाऱ्या, धमक्या देणाऱ्या किंवा गटकांमध्ये दंगल निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्याची तयारी आहे. त्यासाठीचे १० प्रस्ताव तयार केले आहेत. पुढील काही मोहीम, नाकाबंदी, वाहन तपासणी आणि पेट्रोलिंग आणखी वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कायदा मोडणाऱ्यांची गय नाही: शेळके
नगरपालिका निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलली आहेत. कोणतीही राजकीय पाठराखण किंवा दबाव यांचा परिणाम होणार नाही. गुन्हेगार, दंगेखोर किंवा निवडणूक बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तातडीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिला.