‘लोकमान्य’तर्फे उद्या मराठी गीतांचा कार्यक्रम
सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे जागतिक मराठी दिनानिमित्त आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे जागतिक मराठी दिनानिमित्त दि. 27 फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे ‘ऐसी अक्षरे, स्वर-ताल रसिके मेळवीन....!’ हा श्र्रवणीय मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 27 फेब्रुवारी हा कविवर्य, श्रेष्ठ नाटककार, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. लोकमान्य परिवाराच्या लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवषी हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमात मुंबईचे गायक महेश कुलकर्णी, ऋषिकेश अभ्यंकर, गायिका तनुश्री जोग, मयुरी चव्हाण सहभागी होणार आहेत व त्यांना मुंबईचे विनायक नाईक आणि बेळगावचे संतोष गुरव, महेश पवार साथसंगत देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन अनिल चौधरी करणार आहेत. सदर कार्यक्रम सायंकाळी ठिक 5 वाजता सुऊ होईल, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे. सभागृहातील पहिल्या दोन रांगा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, याची रसिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे रक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. केएलई सोसायटीच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. फेब्रुवारी 27 हा दिवस कविवर्य, ज्येष्ठ नाटककार, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकमान्य परिवाराच्या सामाजिक व सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कर्करोग सर्जन डॉ. कुमार विंचूरकर यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. कुमार विंचूरकर यांचा अल्प परिचय
एम. एस. (जनरल सर्जरी), डीएनबी-सर्जिकल ऑन्कोलॉजी पर्यंतचे शिक्षण डॉ. कुमार विंचूरकर यांनी पूर्ण केले आहे. 2012 पासून केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. सध्या जे. एन. मेडिकल कॉलेजमधील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व एमआरसीचे मुख्य कर्करोग सर्जन म्हणून ते मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी आजवर अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत.