महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लाभाविण प्रीती

06:13 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी
Advertisement

दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेमलहरी

Advertisement

गुणरसपान हेचि सुख, प्रेम तया नाम जनी

कसा धरी लोभ मनी? खरा तो प्रेमा..

माणिक वर्मांचं हे खासमखास गाणं मूळ आहे. संगीत मानापमान नाटकातलं. आता याची भाषा किती जरी अवघड असली तरी त्यात ‘प्रेमा’ म्हणजे काय हे अचूक सांगितलं आहे. आणि ते आजही खरं आहे. ‘खरा तो प्रेमा’ आजच्या काळात अतीच दुर्मिळ झालेला असल्यामुळे ज्या कुणा भाग्यवंताला त्याचा लाभ होतो तो तर

आजकल पॉंव जमीं पर नहीं पडते मेरे

बोलो देखा है कभी तुमने मुझे उड़ते हुए?

असंच म्हणत फिरत असतो. प्रेम म्हणजे काय आणि त्याचा खरेपणा म्हणजे काय हे प्रश्न कळीचेच आहेत खरं तर. कारण लाखो लोक प्रेमात पडतात आणि कुणाला तरी आपलं जग मानून अख्ख्या जगाशी(म्हणजे आपापली कुटुंबं बरं का!)पंगा घेऊन प्रेमविवाह करतात आणि मग लग्नानंतर परत एकदा जगाशी(म्हणजे लग्नाआधी ज्याला जग मानलं तो जोडीदार बरं का!)भांडण... म्हणून की काय हल्ली नांदा सौख्यभरे न म्हणता भांडा सौख्यभरे असं म्हणतात. गंमतीचा भाग वगळा, पण प्रेम मिळणं जितकं दुर्मिळ तितकंच प्रेमात पडणं फार फार गोड

असतं.

एखादी व्यक्ती एकाएकी आवडणं, तिचा चेहरा सारखा समोर येणं तिला पाहिल्याशिवाय चैन न पडणं आणि जीव व्याकूळ होणं ही जाणीवच मुळी भारी असते. पुलंनी स्वत:चा अनुभव सांगितल्याप्रमाणे ‘आपण आत्ता इथे या क्षणी प्रेमात पडत आहोत.’ याचं थ्रिलच काही और असतं. खरं प्रेम कायम राहतं. उडते ती वासना. प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. बालिश प्रेम म्हणतं, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.

तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवतं.

प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता. आणि ती असली की मग

सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था

आज भी है और कल भी रहेगा

असं ठामपणे सांगता येतं. बरं या प्रेमात पडलेल्या व्यक्ती जेव्हा भेटणार असतात तेव्हा त्यांची उत्सुकता अगदी टोकाला पोहोचलेली असते.

जरासी आहट होती है तो दिल सोचता है

कहीं ये वो तो नहीं?

वाट पहाणे किती वाईट असतं ते त्यांना विचारा. आणि हे गाणं जीव कसा तिळातिळाने जाळतं ते ऐकल्यावर कळेल. ल...ता...दी....दी एवढा उच्चार करायलाही जीव शिल्लक रहात नाही. कहीं ये वो तो नहीं म्हणताना ‘वो’ चा तो मोहक वेलबुट्टीदार हेलकावा केवळ आहाहा...तर अशा तिला पानं सळसळल्याची चाहूल जरी लागली तरी वाटतं तो तर आला नसेल... आणि दचकून दचकून जागं रहायला होतं. त्याच दचक्यात झोप लागावी. उठायला उशीर व्हावा आणि दारावर टकटक व्हावी, नेमका तोच असावा. मग काय,

मी न केली सखे अजून वेणीफणी

मी न पुरते मला निरखिले दर्पणी

अन् सडाही न मी टाकला अंगणी

राहले नाहणे कुठून काजळ भरू?

सजण दारी उभा, काय आता करू?

घर कधी आवरू? मज कधी सावरू?

अशी गोड फजिती होऊन जाते. ‘हृदय माझे कसे मीच हृदयी धरू?’ सुरेश भटांना ही ओळ सुचली तरी कशी असेल? किती जीवघेणी आहे ती...तो तिचं काळीज आहे हे सांगायची ही किती म्हणून जीवघेणी पद्धत? प्रेम माणसाला प्रचंड ऊर्जा देतं. मानसिक ताकद देतं. जगाला लाथ मारून निघालेली माणसं.

छत आकाशाचे आपुल्या घराला

तृणांकुराची शय्या आणिक तुझाच बाहु उशाला

या शापित आयुष्याला...

म्हणत आयुष्य फेकून द्यायला निघतात. एरवी संन्यासी म्हणून जगणारा पराशर जेव्हा मत्स्यगंधेच्या प्रेमात पडतो तेव्हा,

दुर्दैवे आपण दुरावलो या देही

सहवास संपता डागळले ऋण तेही

स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी

या शब्दांत प्रेमाची महती सांगून जातो. बऱ्याचदा खऱ्या प्रेमाला अपूर्णतेचा शाप असतो.

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

अर्धोन्मीलित कळ्या मोठ्या गोड दिसतात. पण एकदा का त्या पूर्ण उमलल्या की कोमेजून जातात. त्यांचं खरं आयुष्य नवथरपणातच असतं. वास्तवाचे चटके सोसत नाहीत त्यांना. प्रेमाचंही असंच होतं काहीतरी. मुळात ज्याला आपण प्रेम म्हणतो ते काय असतं? तर इतरांच्या आनंदासाठीची मनोकामना करणे आणि त्यांच्या सुखासाठी प्रयत्नशील असणे, त्या सुखाची कारणे शोधणे म्हणजे प्रेम होय. प्रत्येकाला या भावनेची गरज आहे, या आधारतत्त्वावर प्रेम सार्वभौम आणि अमर्याद ठरते. इतरांच्या गरजांबाबत संवेदनशील असणे आणि त्यांच्या सुखप्राप्तीसाठी योगदान देण्याची इच्छा बाळगणे म्हणजेच प्रेम. म्हणून तर ययातिचा पुत्र पुरु त्याला आपलं तारुण्यही द्यायला तयार होतो. कारण मुळात पुरु हा शर्मिष्ठेचा पुत्र. ययाती आणि शर्मिष्ठेच्या अतिउत्कट विशुद्ध प्रेमातून जन्मलेला बाळ आहे. त्यामुळे त्याग, समर्पण या गोष्टी तो घेऊनच आलेला आहे.

जेव्हा प्रेम हे विश्वव्यापी होतं तेव्हा सामान्य माणसापेक्षा वेगळी पातळी गाठली जाते. मग वसुधैव कुटुंबकम् ची भावना जागृत होते आणि माउली जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागते.

चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन

ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु.

किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी

भजिजो आदिपुरुखी अखंडित

जगातलं सर्वात सुंदर ते ते सर्वांना मिळो. ‘कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दु:खी असू नये’ ही भावना निर्माण होते. ‘प्रेम की गंगा’ अखंड वाहत राहते.

अंतरात ये कुठून हाक ही मला

येथला उठून जीव स्वैर पांगला

ये ये मज घे कवेत श्रमितवत्सला

म्हणत बाकीबाब बोरकर थेट त्या ईश्वरालाच हाका मारतात. प्रेम म्हणजे प्रेम म्हणाल तर असं असतं.

ऐसी कळवळ्याची रीती

करी लाभाविण प्रीती

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article