प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
तपासात सहकार्य केल्याचे खंडपीठाचे निरीक्षण
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियरप्रकरणी मतप्रदर्शन केल्यानंतर प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी पोलिसांना तपासकामात सहकार्य दिल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नोंदवून त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांचा जामीन अर्जही निकालात काढला आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. इतर काही जणांनी या प्रकरणात केलेले हस्तक्षेप अर्जही निकालात निघाल्याचे न्या. भारत देशपांडे यांनी निवाड्यातून स्पष्ट केले आहे.
डिचोली येथील एका सभेत बोलताना वेलिंगकर यांनी झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या वक्तव्यावऊन मोठा वाद निर्माण झाला आणि मडगावात लोकांनी रस्त्यावर उतऊन वेलिंगकरांच्या विरोधात निदर्शने केली होती तसेच त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत होती. अशा परिस्थितीत अटक होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यास आव्हान देऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
आमदार क्रूझ सिल्वा, माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमांव, वॉरेन आलेमाव, जीना परेरा, फ्रान्सिस फर्नांडिस अशा एकूण 5 जणांनी हस्तक्षेप अर्ज सादर कऊन जामिनास विरोध दर्शवला होता. वेलिंगकर आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले तसेच पोलीस तपासातही त्यांनी सहकार्य केले. सिल्वा यांनी मडगाव पोलिसांत वेलिंगकरांविरोधात तक्रार दिली होती. ती नंतर डिचोली पोलिसात वर्ग करण्यात आली आहे.