प्रा. मजहर आसिफ‘जामिया’चे नवे कुलगुरू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशातील प्रसिद्ध जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळाले आहेत. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लँग्वेजेसच्या प्राध्यापकाची नियुक्ती ‘जामिया’मध्ये केली आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, प्रा. मजहर आसिफ यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या उपसचिव श्रेया भारद्वाज यांनी जेएमआयच्या रजिस्ट्रारला पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्रा. मजहर आसिफ हे विविध केंद्रीय संस्था आणि विभागांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य आणि अध्यक्ष राहिले आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुदा समितीशिवाय, ते शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय देखरेख समितीचे सदस्य आहेत. त्याव्यतिरिक्त ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीज, सेंटर फॉर पर्शियन अँड सेंट्रल एशियन स्टडीज विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. सुफीवाद आणि भारताचा मध्ययुगीन इतिहास या विषयांचे ते तज्ञ आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर जेएनयूमधूनच पीएचडी पूर्ण केली. प्रोफेसर आसिफ यांना केवळ पदव्युत्तर स्तरावर 20 वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांच्या देखरेखीखाली 8 रिसर्च स्कॉलर्सना पीएचडीची पदवीही मिळाली आहे.