पिनाका शस्त्र यंत्रणेचे परीक्षण यशस्वी
‘डीआरडीओ’कडून निर्मिती : शस्त्रनिर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा पार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘पिनाका’ या भारतनिर्मित शस्त्र आणि क्षेपणास्त्र यंत्रणेचे यशस्वीरित्या परीक्षण करण्यात आले आहे. यामुळे भारताने शस्त्रनिर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या शस्त्रयंत्रणेची निर्मिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) करण्यात आली असून ही अत्याधुनिक आणि बेजोड यंत्रणा असल्याचे प्रतिपादन या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
हे परीक्षण प्रोव्हीजनल स्टाफ क्लालिटेटिव्ह रिक्वायरमेंट (पीएसक्यूआर) या स्वरुपाचे होते. या परीक्षणात या यंत्रणेची मारक क्षमता, अचूकता, पल्ला, सातत्य आणि अग्नीबाण प्रक्षेपित करण्याचा वेग यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्वनिर्धारित लक्ष्यावर अचूक मारा करण्याची या यंत्रणेची क्षमताही या परीक्षणात आजमावण्यात आली, अशी माहिती डीआरडीओकडून देण्यात आली आहे.
लवकरच समावेश होणार
या अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश भारतीय सैन्यदलांमध्ये लवकरच केला जाणार आहे. या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचीही डीआरडीओची योजना आहे. या यंत्रणेच्या सर्व महत्त्वाच्या आणि आवश्यक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आता ही एक परीपूर्ण शस्त्रयंत्रणा म्हणून ओळखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीएसक्यूआर परीक्षणे उत्तमरित्या पूर्ण केल्याने आता ही यंत्रणा प्रत्यक्ष नियुक्त होण्याच्या स्थितीत आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
विविध स्थानी परीक्षणे
या यंत्रणेची त्रिस्तरीय परीक्षणे देशातील विविध भागांमधील परीक्षण केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या दूरनियंत्रण क्षमतेचेही (गायडेड कॅपॅसिटी) अनेकदा कठोर परीक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक परीक्षणात या यंत्रणेने तिची विश्वासार्हता सिद्ध केली असून त्यामुळे तिचे उत्पादन लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या यंत्रणेचे विविध भाग वेगवेगळ्या उत्पादन संस्थांनी निर्माण केले आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या परीक्षणात विविध संस्थांनी निर्माण केलेले 12 अग्नीबाण आणि त्यांचे प्रक्षेपक यांची परीक्षा करण्यात आली आहे.
एकाचवेळी अनेक लक्ष्यभेद
एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची या यंत्रणेची क्षमता आहे. ही यंत्रणा सर्व प्रकारच्या आणि अत्यंत टोकाच्या हवामानातही समान क्षमतेने कार्य करु शकते. अनेक अग्नीबाणांचे एकाचवेळी वेगवेगळ्या दिशांमध्ये प्रक्षेपण या यंत्रणेच्या माध्यमातून करता येते. या यंत्रणेच्या समावेशामुळे भारतीय सैन्यदलांच्या मारक क्षमतेत मोठी आणि निर्णायक वाढ होणार आहे. तसेच भारताचे विदेशांवरचे अवलंबित्व अत्यंत कमी होणार आहे. या यंत्रणेतील अग्नीबाणांचा पल्ला वाढविण्याची डीआरडीओची योजना असून ती येत्या काही वर्षात पूर्ण केली जाणार आहे. सध्या या अग्नीबाणांचा पल्ला भारताच्या सध्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यास पुरेसा आहे, अशीही माहिती डीआरडीओकडून देण्यात आली.
अर्मेनियाला निर्यात
या स्वदेशनिर्मित यंत्रणेने विदेशांमध्येही प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळविण्यास प्रारंभ केला आहे. 2023 मध्ये अर्मेनिया या देशाने या यंत्रणेची आयात केली आहे. अर्मेनियाला अझरबैजान या देशापासून धोका असल्याने स्वत:च्या संरक्षणासाठी आणि वेळप्रसंगी शत्रूवर हल्ला करण्यासाठी या यंत्रणेची निवड केली. फ्रान्स देशालाही ही यंत्रणा आपल्या सैन्यदलांमध्ये समाविष्ट करण्यात स्वारस्य आहे. त्यामुळे फ्रान्स यासंदर्भात भारताशी चर्चा करीत असून ही चर्चा पुढच्या टप्प्यांवर पोहचली आहे. त्यामुळे या यंत्रणेने आपली निर्यातक्षमताही सिद्ध केली आहे.
पिनाकाची महत्त्वाची वैशिष्ट्यो
ड अवघ्या 44 सेकंदांमध्ये एकापाठोपाठ 12 अग्नीबाणांचा मारा शक्य
ड 700 मीटर गुणिले 500 मीटर या क्षेत्रफळात अचूक माऱ्याची क्षमता
ड प्रारंभीचा पल्ला होता 37.5 किलोमीटर, सुधारित पल्ला 75 किलोमीटर
ड या प्रकारच्या विदेशी यंत्रणाच्या निम्मा उत्पादन खर्च, त्यामुळे लाभदायक
ड वेग, अचूकता, साल्व्हो क्षमता, लक्ष्यभेद क्षमता आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची
ड 2023 मध्ये अर्मेनियाला निर्यात, फ्रान्सकडूनही आयात होण्याची शक्यता