हायकमांडच्या निर्णयानुसार वाटचाल
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया : शिवकुमार यांच्या निवासस्थानी ‘ब्रेक फास्ट मिटींग’
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील मुख्यमंत्रिपद हस्तांतराच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला आहे. आता दुसऱ्यांदा ‘ब्रेक फास्ट मिटींग’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात पुन्हा एकदा नाश्त्याच्या निमित्ताने बैठक होऊन राजकीय विषयांवर चर्चा झाली. हायकमांड सांगेल त्याप्रमाणे वागेन. राहुल गांधी काय निर्णय घेतात त्यानुसार वाटचाल करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे हायकमांडने दिलेल्या सूचनेवरून मागील आठवड्यात शनिवारी सकाळी सिद्धरामय्यांनी शिवकुमारांना आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले हेते. आता मंगळवारी सकाळी उभयतांमध्ये दुसऱ्यांदा नाश्त्याच्या निमित्ताने बैठक झाली. शिवकुमारांनी शाकाहार तर सिद्धरामय्या यांनी मांसाहार घेतला. यावेळी सुमारे तासभर दोघांनी चर्चा केली. तत्पूर्वी शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांचे आत्मियतेने स्वागत केले. याप्रसंगी माजी खासदार डी. के. सुरेश व कुणिगलचे आमदार एच. डी. रंगनाथ उपस्थित होते.
अधिवेशनावर चर्चा
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, आम्ही नाश्त्याच्या निमित्ताने बसून पक्ष आणि सरकारच्या कामकाजावर चर्चा केली. 8 डिसेंबरपासून बेळगावमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून त्यावरही आम्ही एकत्रित चर्चा केली. विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले.
मी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार भाऊ आहोत. दोघेही एकाच पक्षाचे, एकाच विचारसरणीचे आहोत. आम्ही नेहमी एकत्र असतो. आमच्यात मतभेद नाहीत. पुढील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणार आहे. राहुल यांधी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागले पाहिजे. सर्व आमदार एकत्र आहेत, भविष्यातही आम्ही एकत्र राहू. अधिवेशनावेळी सर्व आमदार एकत्रितपणे विरोधी पक्षांना सामोरे जातील, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
नेतृत्वाबाबत हायकमांड निर्णय घेईल
राज्यात नेतृत्वात बदल करण्याबाबत हायकमांड निर्णय घेईल. वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतांच्या आधारे निर्णय घेतला जाईल. हायकमांडच्या निर्णयाप्रमाणे मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाईल. मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत परवाच (शनिवारी) निर्णय झाला आहे. बुधवारी एआयसीसीचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल मंगळूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांची भेट घेईन. हायकमांड बोलवेल तेव्हा जाईन, असे सिद्धरामय्या यांनी त्यांनी सांगितले.
शिवकुमार केव्हा मुख्यमंत्री बनतील, या प्रश्नावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, हायकमांड म्हणेल तेव्हा शिवकुमार मुख्यमंत्री बनतील, असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
मका रेशन अंतर्गत देणे अशक्य
शिवकुमार यांच्यासोबत राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्येबाबतही चर्चा झाली. सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. यंदा शेतकऱ्यांनी मका भरघोस पिकविला आहे. केंद्र सरकारने मक्यासाठी प्रतिक्विंटल 2,400 रुपये दर निश्चित केला आहे. प्रत्यक्षात बाजारपेठेत वेगळा दर आहे. केंद्र सरकार आधारभूत दर आणि अधिकतम मूल्य निर्धारित करते. मका रेशनमार्फत वितरण करण्यास केंद्र सरकारने सांगितेले आहे. मात्र, तसे करणे शक्य नाही, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
8 रोजी दिल्लीला
नाश्त्यासाठी मीच मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. मात्र, त्यांनीच मला त्यांच्या निवासस्थानी बोलावले. त्यामुळे तेथे पहिली ब्रेक फास्ट मिटींग झाली. मंगळवारच्या बैठकीत पक्ष, सरकार, विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड, दिल्लीला खासदारांचे शिष्टमंडळ आणि विधिमंडळ अधिवेशनावर चर्चा झाली. उत्तम प्रशासन आणि राज्याची निरंतर प्रगती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावण्याबाबत चर्चा केली आहे. 8 डिसेंबर रोजी आम्ही दिल्लीला जाणार असून त्याच दिवशी परत येणार आहे, असे शिवकुमार यांना सांगितले.
...तर मीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नाश्त्यासाठी बोलावेन : शिवकुमार
राज्यात ब्रेक फास्ट मिटींगवरून राजकारणाला ऊत येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांसाठी नाश्त्याच्या निमित्ताने आमंत्रण देऊन बैठक घेतली आहे. आता त्यात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भर पडली आहे. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून मुख्यमंत्रिपदाचा वाद परस्पर चर्चेद्वारे मिटविण्यात आल्यानंतर डॉ. परमेश्वर यांनी प्रतिक्रिया देताना आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना नाश्त्यासाठी माझ्या घरी बोलावेन. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना नाश्त्यासाठी मी का बोलावू नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.