For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम आदमी पक्षाची गोची

06:30 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आम आदमी पक्षाची गोची
Advertisement

राजकारणात साधनशुचितेचा लोप होत आहे. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. यामुळे देशाची हानी होत आहे, अशी भूमिका घेत आम आदमी पक्षाने आपल्या राजकारणाचा प्रारंभ केला. तथापि, आज हा पक्ष याच जंजाळात अडकलेला दिसून येतो. या पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानामध्ये मारहाण होण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. स्वाती मालीवाल यांची नियुक्ती स्वत: केजरीवाल यांनी राज्यसभेवर केली होती. मात्र, आज त्यांना पक्षाने वाऱ्यावर सोडून दिल्याचे दिसून येते. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्य विभव कुमार यांच्यावर मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, हे भारतीय जनता पक्षाचेच कारस्थान आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला. तो हास्यास्पद वाटतो. कारण मालीवाल यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली असून त्यांनी प्रत्यक्ष केजरीवाल यांच्याकडेही बोट दाखविले आहे. हे प्रकरण या पक्षातील अंतर्गत आहे. त्याचा भारतीय जनता पक्षाशी संबंध काय? असा प्रश्न कोणाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अगोदरच, मद्यधोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाची पुरेवाट झाली आहे. प्रत्यक्ष केजरीवाल यांच्यावर कारागृहात राहण्याची वेळ आली. त्यांना प्रचारापासून रोखण्यासाठी हे कारस्थान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केले, असा जरी आरोप आम आदमी पक्षाचा असला, तरी जामीन देणे किंवा न देणे हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या हाती नसते. तर ते स्पष्टपणे न्यायालयाच्या हाती असते. केजरीवाल सध्या सशर्त जामीनावर बाहेर आहेत. मात्र, जामीन केवळ प्रचारासाठी आणि तेव्हढ्यापुरताच देण्यात आला आहे. मतदानाचा अंतिम टप्पा संपताच 2 जूनला, म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या मतगणनेची वाटही न पाहता त्यांना कारागृहात पुन्हा जावे लागणार आहे. हे प्रकरण सुरु असतानाच, त्यात मालीवाल प्रकरणाची भर पडली. या प्रकरणातील सत्य काहीही असले तरी त्यामुळे पक्षाची आणि केजरीवाल यांची स्वत:ची प्रतिमा मलीन झाली, ही बाब नाकारता येत नाही. मालीवाल यांना मारहाण झाल्याची बाब या पक्षाचे नेते संजयसिंग यांनी स्वत: स्पष्टपणे आणि उघडपणे मान्य केली होती. तसेच विभव कुमार यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रतिपादन त्यांनी केले होते. नंतर मात्र, संजय सिंग आणि आम आदमी पक्ष यांनी यु टर्न घेत विभव कुमार निर्दोष असल्याचा निर्वाळा दिल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. मालीवाल यांचा वैद्यकीय अहवालही त्यांना जखमा झाल्याचे नमूद करतो. मग या जखमा त्यांनी स्वत:च स्वत:ला करुन घेतल्या, असे म्हणायचे काय, असाही प्रश्न आहे. आणि हे सर्व कशासाठी, तर स्वत:च्याच पक्षाला अडचणीत आणण्यासाठी? पक्ष नेतृत्वाशी त्यांचे पटत नव्हते अशी स्थिती असेल तर त्या पक्ष सोडू शकल्या असत्या. किंवा पक्षाने स्वत: त्यांना निलंबित केले असते. आजवर अनेक मान्यवर आम आदमी पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यांच्यामध्ये प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, अशुतोष पांडे, कवी कुमार विश्वास आदी लोकांनी हा पक्ष सोडला आहे. त्यांच्यापैकी काहींनी पक्ष सोडताना केजरीवाल हे एकाधिकारशाही गाजवतात असा आरोपही केला आहे. मालीवाल या सुद्धा अशा प्रकारे पक्ष सोडू शकल्या असत्या. पण पक्ष सोडण्याची त्यांची इच्छा त्यांनी कधीही व्यक्त केली नव्हती. किंवा पक्षनेतृत्वासंबंधी त्यांच्या तक्रारी आहेत, असे पक्षाकडून किंवा त्यांच्याकडून केव्हाही सूचित करण्यात आल्याचे प्रसिद्ध झालेले नाही. त्यांनी मारहाणीचा आरोप केल्यानंतरच हे आरोप-प्रत्यारोपांचे मोहोळ उठले आहे. याचाच अर्थ असा की, केजरीवाल, त्यांचा स्वीय सहाय्य विभव कुमार किंवा आम आदमी पक्ष यांची बाजू पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येत नाही. या प्रकरणाची चौकशी होणे आणि सत्य बाहेर येणे हे त्यासाठीच आवश्यक आहे. सध्या ही चौकशी सुरु आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतरच काय ते समजून येईल. केजरीवाल यांनी जेव्हा राजकारणाचा प्रारंभ केला, तेव्हा त्यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप उघडपणे नावे घेऊन केले होते. नंतर या नेत्यांची क्षमायाचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली. कारण आरोप नुसता करुन चालत नाही. त्याचा पुरावाही असावा लागतो. आज केजरीवाल मालीवाल प्रकरणात भारतीय जनता पक्षावर अशाच प्रकारचा आरोप करीत आहेत. उद्या त्याही संबंधात त्यांच्यावर क्षमायाचना करण्याची वेळ येऊ शकते. एकेकाळी त्यांनी ज्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप केले होते, त्यांच्यामध्ये काँग्रेसचाही समावेश होता. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यापासून अनेक नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले होते. आज त्याच काँग्रेसशी युती करण्याची वेळ त्यांच्यावर आली. विरोधी पक्षांच्या आघाडीत केजरीवाल यांचा पक्ष समाविष्ट आहे. याच आघाडीतील नेत्यांवर त्यांनी पूर्वी आरोप केले होते. त्यामुळे केजरीवाल हे स्वत:ही अन्य राजकारण्यांप्रमाणेच आहेत, हे त्यातून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या पक्षात घडलेल्या घटनांसंबंधी अन्य पक्षांना दोष देणे योग्य नाही. मालीवाल प्रकरण असो, किंवा मद्यधोरण घोटाळा असो, केजरीवाल यांनी इतरांवर चिखलफेक करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्याच पक्षाची, आपणच निवडलेली खासदार महिला, असे गंभीर आरोप करत आहे, याचा त्यांनी तितक्याच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, त्यांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात राजकारण अत्यंत स्पर्धात्मक झाले आहे. अशावेळी स्वत:ची बाजू भक्कम ठेवणे आणि स्वत:च्या पक्षात काही गैरप्रकार घडत असतील, तर ते घडू न देणे, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी अन्यांवर आरोप करण्यातून काहीही साध्य होणार नाही. केवळ आम आदमी पक्ष नव्हे, तर सर्वच पक्षांनी हे पथ्य पाळणे योग्य आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.