तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाणपुलावरील समस्या कायम
दुरुस्तीसाठी टाकलेली खडी रस्ताभर पसरल्याने नाराजी
बेळगाव : टिळकवाडी तिसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी खोदाई करून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून करण्यात आला. परंतु, टाकण्यात आलेली खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी ये-जा करणे अवघड झाल्याने दुरुस्तीच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उड्डाणपुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दोन दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. ज्या ठिकाणी रस्ता खचून खड्डे पडले होते, तेथील डांबरीकरण उकरून काढण्यात आले. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असतानाच केवळ खडी टाकण्यात आल्याने अवजड वाहनांमुळे ही खडी संपूर्ण रस्ताभर पसरल्याने पुन्हा अपघात घडत आहेत. बेळगावच्या नागरिकांना केवळ पाने पुसण्याचे काम केले जात असल्याने वाहनचालकांत नाराजी आहे. शहरातून उद्यमबागकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत असली तरी रविवारी रात्रीपयर्तिं केवळ खडी टाकून ठेवण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.