प्रो कबड्डी लीग हंगाम 18 ऑक्टोबरपासून
नवी दिल्ली : अकराव्या प्रो कबड्डी लीग हंगामाला 18 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे. भारतामध्ये प्रो कबड्डी लीग स्पर्धेने अमाप प्रसिद्धी मिळविली आहे. त्यामुळे कबड्डी शौकिन ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे प्रमुख सेलीब्रीटी रितेश देशमुख, सुदीप किचाचा, आलिया भट्ट, भुवन बाम तसेच क्रिकेटपटू केएल राहुल आणि हार्दीक पंड्या हे आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती निश्चितच राहणार आहे. प्रो कबड्डी लीगचे हे ब्रॅन्ड अॅम्बेसीडर आहेत. महाराष्ट्रातून रितेश देशमुख तर कर्नाटकातून सुदीप किचाचा यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून कबड्डी शौकिनांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
2024 सालातील होणारी अकरावी प्रो कबड्डी लीग स्पर्धा तीन शहरांमध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला टप्पा 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान हैद्राबादच्या जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात त्यानंतर दुसरा टप्पा 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान ग्रेटर नोयडातील इनडोअर स्टेडियमध्ये तसेच तिसरा आणि शेवटचा टप्पा पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 3 ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील अव्वल कबड्डीपटू पवन सेहरावत, प्रदीप नरवाल, फजल अत्राचली हे प्रमुख आकर्षण ठरतील.