For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-बांगलादेश दुसरी कसोटी आजपासून

06:10 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत बांगलादेश दुसरी कसोटी आजपासून
Advertisement

यजमानांसमोर ‘क्लीन स्वीप’चे लक्ष्य, विराट-रोहितकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा, सामन्यावर पावसाचे सावट, कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/कानपूर

भारताची दुसरी आणि शेवटची कसोटी आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असून त्यात बांगलादेशविऊद्ध ‘क्लीन स्वीप’ करण्याचे बलाढ्या यजमानांचे लक्ष्य असेल. खास करून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून चमकदार कामगिरीची संघाला अपेक्षा असेल. रविचंद्रन अश्विनचे अष्टपैलू प्रदर्शन, शुभमन गिलचे शानदार शतक, रवींद्र जडेजाची दर्जेदार फलंदाजी आणि रिषभ पंतचे धडाकेबाज पुनरागमन यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी दबावाखाली आणूनही चेन्नईत आरामात विजय मिळविला होता. सध्या भारत मायदेशातील सलग 18 व्या मालिका विजयाच्या वाटेवर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केल्यानंतर पंतने कसोटीत आपण जास्त प्रभाव पाडू शकतो हे दाखविण्याची वेळ आली होती आणि या संधीचा त्याने फायदाही घेतला.

Advertisement

तथापि, बांगलादेशचे वेगवान गोलंदाज हसन महमूद आणि तस्किन अहमद यांनी पोषक खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केल्याने रोहित आणि विराटची बॅट मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यात तळपू शकली नाही. पुढे कसोटीचा मोठा हंगाम असल्याने हे दोन प्रमुख फलंदाज वेळीच फॉर्मात येण्यास उत्सुक असतील. येथील ग्रीन पार्कवरील खेळपट्टी पारंपरिकपणे संथ आणि फिरकीपटूंना मदत करणारी राहिली आहे. सुऊवातीला या खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत लाभणे अपेक्षित असले, तरी उन्नाव येथून आणलेल्या काळ्या मातीने तयार केलेल्या या खेळपट्टीचे मूळ स्वरूप फारसे बदलण्याची शक्यता नाही. जसजसा खेळ पुढे सरकत जाईल तसतशी खेळपट्टी संथ होत जाईल. याचा अर्थ भारत तीन वेगवान गोलंदाजांऐवजी तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो. तसे झाल्यास आकाश दीपला विश्रांती देऊन कुलदीप यादवसाठी मार्ग मोकळा होऊ शकतो.

2021 मध्ये ग्रीन पार्क येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत भारताने अश्विन, जडेजा आणि अक्षर अशा तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवले होते. न्यूझीलंडविरुद्धचा तो सामना रोमहर्षक बरोबरीत संपला होता. विशेष म्हणजे 2021 चा सामना आणि त्यापूर्वीचा 2016 मधील न्यूझीलंडविऊद्धचा येथील सामनाही पाच दिवस चालला होता.

दुसरीकडे, मालिकेतील सलामीच्या सामन्यात फलंदाजीत चमक दाखविण्यात अपयशी ठरलेल्या बांगलादेशने त्यांच्या संघरचनेत बदल करणे अपेक्षित आहे. त्यांनी चेन्नईत उच्च दर्जाच्या भारतीय वेगवान माऱ्यासमोर संघर्ष केला आणि नंतर अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना अश्विन आणि इतर फिरकी गोलंदाजांनाही त्यांना नीट हाताळता आले नाही. शकिब अल हसनच्या उपलब्धतेबाबत संघ व्यवस्थापनाने विरोधाभासी विधाने केली आहेत. चेन्नईमध्ये फलंदाजी करताना बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका असल्याचे एका निवड समिती सदस्याने सांगितले होते, तर मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुऊसिंघे यांनी तो निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले होते. बांगलादेश डावखुरा फिरकीपटू तैजुल इस्लामला दुबळा वेगवान गोलंदाज नाहिद राणाऐवजी संघात आणू शकतो. त्यांच्याकडे ऑफस्पिनर नईम हसनचाही पर्याय आहे.

रवींद्र जडेजा 300 बळींच्या उंबरठ्यावर

दरम्यान, 73 कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाने 299 बळी घेतले असून 3122 धावा केल्या आहेत. 300 बळी आणि 3000 धावा पूर्ण करणारा कसोटी इतिहासातील दुसरा सर्वांत वेगवान खेळाडू बनण्यासाठी त्याला फक्त एका बळीची आवश्यकता आहे. इंग्लंडचा महान खेळाडू इयान बॉथमने 72 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

कानपूरमधील कसोटीत 41 वर्षे भारत अजिंक्य

टीम इंडियाने कानपूरमध्ये 1952 पासून ते आतापर्यंत 23 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने या 23 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच भारताने 13 सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. भारत कानपूरमध्ये गेल्या 41 वर्षांपासून अजिंक्य राहिली आहे. भारताने कानपूरमध्ये अखेरीस 1983 साली विंडिज विरुद्ध कसोटी सामना गमावला होता. तेव्हापासून कोणताही संघ टीम इंडियाला पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे बांगलादेशसाठी खऱ्या अर्थाने कानपूरमध्ये ‘कसोटी‘ असणार आहे.

...तर कानपूर कसोटी शेवटची

कानपूर : जर बांगलादेश क्रिकेट मंडळाने घरच्या मैदानावर निरोपाचा कसोटी सामना खेळण्याची संधी दिली नाही, तर भारताविऊद्धची आजपासून सुरू होणारी दुसरी कसोटी ही आपली शेवटची असेल, असे बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने गुऊवारी जाहीर केले. या 37 वर्षीय अनुभवी खेळाडूने 69 कसोटीत 4453 धावा  जमविताना 242 बळी घेतले आहेत. ‘माझी शेवटची कसोटी मीरपूरमध्ये खेळण्याची इच्छा बीसीबीकडे व्यक्त केली आहे. त्यांनी त्यास सहमती दर्शविलेली आहे’, असे त्याने सांगितले.

भारत-बांगलादेश हेड टू हेड

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 14 कसोटी सामने झाले असून त्यात भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत. बांगलादेश संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. दोन्ही संघांमधील 2 सामने अनिर्णीत राहिले.

ग्रीन पार्कची खेळपट्टी फिरकीला अनुकूल, कुलदीपला संधी?

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणारा हा सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे, याबाबत क्युरेटरने खुलासा केला आहे. ग्रीन पार्कची खेळपट्टी काळ्या मातीपासून बनलेली आहे. काळ्या मातीने बनवलेल्या खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल अशी आहे. पहिल्या दोन दिवसात वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल तर शेवटच्या तीन दिवसांत फिरकीपटूंची भूमिका वाढेल, असे क्युरेटर शिव कुमार यांनी सांगितले. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्यामुळे कर्णधार रोहित तीन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे. तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलपेक्षा कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाऊ शकते. कुलदीपची डावखुरी मनगटाची फिरकी आणि बांगलादेशविरुद्धची त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

पावसाच्या व्यत्ययाची शक्यता

हवामान खेळाडूंसाठी मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता असून गेल्या काही दिवसांपासून शहरात आर्द्रता खूप वाढली आहे. पावसाच्या अंदाजानुसार पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. विशेष म्हणजे, देशात सध्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु आहे. कानपूरमध्येही मागील दोन दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सामन्याच्या पहिल्या दिवशी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीदरम्यान पावसाने हजेरी लावल्यास सामना उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे.

►भारत-रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

►बांगलादेश-नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक.

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.

Advertisement
Tags :

.