व्हाइट हाउससमोर गाझासमर्थकांची निदर्शने
बिडेन यांचा रक्ताने माखलेला मुखवटा झळकला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईदरम्यान अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसबाहेर 30 हजार पॅलेस्टाइन समर्थकांनी निदर्शने केली आहेत. लोकांनी डोक्यावर हमासची पट्टी बांधून तसेच पॅलेस्टाइनचा झेंडा हातात घेत निदर्शने केली आहेत. यादरम्यान एका निदर्शकाच्या हातात अध्यक्ष जो बिडेन यांचा रक्ताने माखलेला मुखवटा देखील होता.
निदर्शकांनी यावेळी अमेरिकेचा ध्वजही पेटवून दिला आहे. लोकांच्या हातात अनेक बॅनर आणि पोस्टर्स होती. यात बिडेन यांच्यावर चुकीची बाजू घेतल्याचा आरोप नमूद होता. निदर्शकांनी स्वतंत्र पॅलेस्टाइनच्या बाजूने घोषणा दिल्या आहेत. गाझावरील बॉम्बवर्षावात जितक्या मुलांनी जीव गमावला, त्यांचा आक्रोश तुम्हाल नेहमीच भयभीत करत राहणार असे निदर्शकांनी बिडेन यांना उद्देशून म्हटले आहे.
निदर्शकांनी नॅशनल पार्कच्या सर्व्हिस रेंजर्सवर सामग्रीही फेकली. याचबरोबर तेथे असलेल्या पुतळ्याचेही नुकसान केले. अमेरिकेकडून इस्रायला मिळत असलेली मदत रोखण्याची मागणी निदर्शकांनी केली. तर निदर्शने पाहता व्हाइट हाउसनजीकची सुरक्षा वाढविण्यात आली.
व्हाइट हाउसबाहेर निदर्शने होत असताना बिडेन हे मागील 4 दिवसांपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक दिन डी-डेच्या 80 व्या वर्धापनदिनाशी निगडित कार्यक्रमांसाठी बिडेन यांच्यासोबत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग देखील फ्रान्सच्या दौऱ्यावर पोहोचले होते.
इस्रायल आणि हमास यांच्यात 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान निदर्शकांनी अमेरिकेच्या विविध ठिकाणी निदर्शने केली आहेत. एप्रिलमध्ये अमेरिकेच्या 50 विद्यापीठांमध्ये सुमारे महिनाभर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. यादरम्यान त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या हॅमिल्टन बिल्डिंगवर कब्जा केला होता. तर पोलिसांना तेथून त्यांना हटवत हजाराहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले होते. यानंतर सुमारे एक आठवड्याने पॅलेस्टाइन समर्थकांनी न्यूयॉर्कच्या एका संग्रहालयावर कब्जा केला होता.