बांदा येथे किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
प्रतिनिधी
बांदा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवायचे असेल तर अभेद्य किल्ल्याची आवश्यकता होती. स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर अत्यंत सुरक्षित व शत्रूला जिंकण्यासाठी कठीण अशा किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याची माहिती आताच्या पिढीला व्हावी यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने किल्ले स्पर्धेत सहभाग घेऊन किल्ल्याची महती सर्वदूर पोहचवावी असे आवाहन बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले.
येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठान व रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या वतीने आयोजित किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात श्री. कामत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, रोटरॅक्तचे अध्यक्ष अक्षय मयेकर, प्रतिष्ठानचे कार्यवाह समीर परब, खजिनदार भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, अनुप बांदेकर, प्रथमेश राणे, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर, शिवम गावडे, ओमकार पावसकर, गिरीश भोगले, कैलास गवस, संजय नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
बांदा शहर मर्यादित दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. १५ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक - दिव्या देसाई (सिहंगड), द्वितीय क्रमांक - ईशा गडेकर व ग्रुप (प्रतापगड), तृतीय क्रमांक - दर्पण देसाई (तोरणा), तर १५ वर्षावरील गटात प्रथम क्रमांक - श्री गणेश मूर्ती शाळा निमजगा (किल्ले जंजिरा), द्वितीय क्रमांक - मानसराज गवस (विसापूर), तृतीय क्रमांक - सर्वेश नाईक (सिंधुदुर्ग किल्ला) यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम, चषक देण्यात आला. सर्व रोख पारितोषिके (कै.) सचिन नाटेकर स्मरणार्थ उद्योजक निलेश नाटेकर व प्रमोद कामत यांनी पुरस्कृत केली.
प्रास्ताविकात भूषण सावंत यांनी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य, शिवविचार तळागाळात पोहचविण्यासाठी भविष्यातील संकल्प याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.