हॉकीपटूंसाठी बक्षिसाची घोषणा
वृत्तसंस्था/पाटणा
राजगीर येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत विद्यमान विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाने अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने बलाढ्या चीनचा पराभव करत पुन्हा स्वत:कडे जेतेपद राखले. या कामगिरीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन करुन या संघातील प्रत्येक खेळाडूला त्यांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय महिला हॉकी संघातील सर्व खेळाडू तसेच प्रमुख प्रशिक्षक, प्रशिक्षकवर्ग यांनाही बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे. विजेत्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला तसेच प्रमुख प्रशिक्षकाला प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस आणि सहाय्यक प्रशिक्षकवर्गाला प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई करंडक स्पर्धेतील बलाढ्या चीनचा 1-0 असा पराभव केला. बिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने जेतेपद राखून नवा इतिहास रचल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली.