प्रियांका वड्रांनी हाती घ्यावी काँग्रेसची धुरा
काँग्रेस नेते राशिद अल्वी यांच्याकडून राहुल गांधींच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह : प्रियांका वड्रा इंदिरा गांधींसारख्या,काँग्रेसचे संघटन अत्यंत कमकुवत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राशिद अल्वी यांनी पक्षाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्षाची स्थिती कमकुवत असून काँग्रेस संघटनेची स्थिती दयनीय झाली असू याकरता थेट स्वरुपात काँग्रेस नेतृत्व जबाबदार आहे. निवडणुकीसाठी मेहनत आणि तयारीप्रकरणी काँग्रेस भाजपसमोर टिकू शकत नाही. भाजप तळागाळात पोहोचत असताना काँग्रेसची मेहनत कुठेच दिसून येत नसल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधींची भेट घेणे काँग्रेस नेत्यांसाठी देखील सोपे नाही. तर इंदिरा गांधींची भेट सहजपणे व्हायची. प्रियांका वड्रा यांच्याकडे पक्षाची धुरा द्यावी कारण त्यांच्यात इंदिरा गांधींचे प्रतिबिंब दिसून येते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सध्या बाजूला फेकले गेले आहेत. याकरताही पक्षनेतृत्वच जबाबदार असल्याचे म्हणत राशिद अल्वी यांनी काँग्रेसमधील हायकमांडच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला.
काँग्रेसमधून उठलेल्या या आवाजामुळे संघटनात्मक स्थिती आणि नेतृत्वाच्या शैलीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार आहे. काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली जात नाही. तर या नेत्यांना आपण काँग्रेस बळकट करू शकतो, असे वाटते. सद्यस्थितीत ज्या नेत्यांना बाजूला सारण्यात आले आहे, त्यांची नाराजी दूर करणे सर्वात आवश्यक आहे. या नेत्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. प्रत्येक पक्षात उतार-चढावाचा टप्पा येतो. तर सध्या कर्नाटकात काँग्रेस अंतर्गत जे काही चालले आहे, ते चिंताजनक असल्याचे अल्वी म्हणाले.काँग्रेसचे पक्षाचे प्रमुख राहुल गांधी नव्हे तर मल्लिकार्जुन खर्गे आहेत. यामुळे त्यांनी कर्नाटकातील गोंधळ लवकरात लवकर दूर करावा, असे अल्वी यांचे म्हणणे आहे.