भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाला प्रियांका जारकीहोळी यांची भेट
प्राणी संग्रहालयाच्या विकासाबाबत चर्चा : भृंगा सिंहीण पर्यटकांसाठी खुली
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. मागील महिन्यात बनेरघट्टा येथून दाखल झालेल्या भृंगा नावाच्या सिंहिणीला प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी आरएफओ पवन कुरलिंग यांनी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. संग्रहालयातील निरुपमा सिंहिणीचा मृत्यू झाल्यानंतर आता भृंगा सिंहीण आणण्यात आली आहे. तिला आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना सिंहिणीला जवळून पाहता येणार आहे. 125 एकर परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात 25 प्रजातीचे एकूण 198 वन्यप्राणी आणि पक्षी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, संग्रहालयातील विकासकामांबाबत जारकीहोळी यांनी माहिती घेऊन संग्रहालयाच्या व्यवस्थापनाबाबत गौरवोद्गार काढले.