‘द ब्लफ’मध्ये प्रियांका चोप्रा
जूनपासून सुरू होणार हॉलिवूडपटाचे चित्रिकरण
ग्लोबल आयकॉन ठरलेली प्रियांका चोप्राची कारकीर्द सध्या बहरत आहे. अभिनेत्री आता अनेक हॉलिवूडपटांमध्ये दिसून येणार आहे. प्रियांका यापूर्वी सिटाडेल या सीरिजमध्ये दिसून आली होती. तसेच पुढील काळात ती रिचर्ड मॅडेनची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही झळकणार आहे. याचबरोबर प्रियांकाने एका हॉलिवूड चित्रपटासाठी करारावर स्वाक्षरी केली असून तो 8 व्या शतकावर आधारित एक पीरियड ड्रामा असणार आहे.
या चित्रपटाचे नाव ‘द ब्लफ’ आहे. या चित्रपटाची निर्मिती द रुसो ब्रदर्सकडून केली जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जून महिन्यात सुरू होणार आहे. यासंबंधी अभिनेत्री तसेच निर्मात्यांकडून अद्याप कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल 2’ आणि ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये काम करत आहे. याचबरोबर ती ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट, कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती रीमा कागतीकडून करण्यात येणार आहे. फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.