प्रियामणि आता नकारात्मक भूमिकेत
स्वत:ची गुणवत्ता दाखवून देणार
कलाकार कुठल्याही प्रतिमेत स्वत:ला अडकवून घेणे पसंत करत नाही. संधी मिळताच तो स्वत:च्या प्रतिभेच्या नव्या पैलूंचे दर्शन घडवून देत असतात. मैदान चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारलेली प्रियामणि आता कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तिचा ‘कोटेशन’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून याची कथा कॉन्ट्रॅक्ट किलरच्या जीवनाभोवती गुंफण्यात आली आहे.
निर्माता-दिग्दर्शक विवेक कुमार कन्ननच्या या चित्रपटात प्रियामणि एका क्रूर टोळीच्या प्रमुखाची भूमिका साकारणार आहे. यात जॅकी श्रॉफ आणि सनी लियोनी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मैदान आणि आर्टिकल 370 मध्ये तिने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. या पार्श्वभूमीवर आता तिने नकारात्मक भूमिकेची निवड केली आहे. एक कलाकार म्हणून तुम्हाला बहुमुखी प्रतिभा दाखवून देण्याची गरज असल्याचे प्रियामणिने म्हटले आहे.
‘कोटेशन’ चित्रपटाद्वारे लोक माझ्याकडून साकारण्यात येणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेचा आनंद घेऊ शकतात असे तिने नमूद केले आहे. प्रियामणिने अलिकडेच ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनचे चित्रिकरण सुरू केले आहे. यात ती मनोज वाजपेयीसोबत मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. या सीरिजची निर्मिती तसेच दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केली आहे.