पृथ्वीराज, हर्षद सदगीर ‘स्वराज्य केसरी’चे मानकरी
संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू खासबाग मैदानात कुस्ती मैदानाचे आयोजन
कोल्हापूर : रोमाचंकारी तुतारीचा निनाद, हलगीचा कडकडाट आणि आठ ते दहा हजार कुस्ती शौकीनांची उपस्थिती, त्यांनी मल्लांना केलेले चिअर-अप, क्षणाक्षणाला वाजत राहिलेल्या टाळ्या-शिट्टया अशा वातावरणात झालेल्या पहिल्या क्रमांकाच्या काटाजोड मल्लयुध्दात देवठाणे (ता. पन्हाळा) येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने इराणच्या हादी इराणी या मल्लाला घिस्सा डावावर आस्मान दाखवून मानाची स्वराज्य केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान मारले. यानंतर लावलेल्या आणखी एका पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीतही पुण्याचा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीरने इराणचा महदी इराणी या मल्लात याने माग पट्टी लावून मोठ्या चपळाई चितपट केले. गेली दोन आठवडे कोल्हापूरसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘स्वराज्य केसरी‘ आंतरराष्ट्रीय निकाली कुस्ती मैदानाचे युवराज संभाजी छत्रपती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात आयोजन केले होते. या मैदानाला 350 वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा, राजर्षी शाहू महाराजांची 150 वी जयंती आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस अशा विशेष निमित्ताची ही किनार होती. तसेच दिल्लीतील गुऊ हनुमान आखाड्याचे ख्यातनाम मल्ल आणि समस्त कोल्हापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पद्मभूषण सतपाल यांची मैदानाला प्रमुख उपस्थित होती.
दुपारी 3 वाजता संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शाहू खासबाग मैदानातील लालमातीच्या आखाड्याचे पुजन करण्यात आले. यानंतर पुढील चार महिन्यांची साजरी होत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून तब्बल 150 कुस्ती मैदानातील लालमातीत लावण्यात आल्या. या कुस्तींचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 8 ते 10 हजार मल्ल, वस्ताद, कुस्ती शौकिन शाहू खासबागेत खांद्याला खांदा लावून बसले होते. 150 कुस्ती पूर्ण झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुण्याचा उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ (पुणे) व आंतरराष्ट्रीय मल्ल लवप्रित खन्ना (पंजाब) या मल्लांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. परंतू मल्लांनी एकमेकांवर डाव न टाकता 8 ते 10 मिनिटे केवळ खडाखडीच केली. खडाखडी नको एकमेकांवर डाव टाकत कुस्ती जिंका, असे पंचांनी मल्लांना सांगितले. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे पंचांनी कुस्तीचा निकाल पॉईंटवर लावण्यात येईल असे मल्लांना सांगितले. यात पृथ्वीराजने लवप्रितवर कब्जा घेत निर्णायक पॉईंट मिळवून कुस्ती जिंकली.