कारवार कारागृहात तंबाखू न दिल्याने कैद्यांनी आपटून घेतले डोके
कारवार : कन्नड सिनेअभिनेता दर्शन आणि त्याच्या गँगच्या कारनाम्यांमुळे बेंगळूर येथील परप्पन कारागृह चर्चेत असताना येथील कारागृहातील कैद्यांच्या तंबाखूच्या मागणीमुळे कारवार कारागृह चर्चेत आले आहे. कारवार कारागृहातील दोन कैद्यांनी वॉर्डनकडे तंबाखूची मागणी केली. तथापि वॉर्डननी कैद्यांना तंबाखू उपलब्ध करून देण्यास नकार दिला. या रागापोटी कैद्यांनी आपले डोके दगडावर आपटून कपाळमोक्ष करून घेतला. त्यामुळे दोन कैदी जखमी झाले आहेत. मोहम्मद मुजमिल आणि फरान छबी अशी त्यांची नावे आहेत.
कपाळमोक्ष करून घेतलेल्या कैद्यांना अन्य दोन ते तीन कैद्यांनी समर्थन दिले असे सांगण्यात आले. तंबाखू उपलब्ध करून देण्याची मागणी वॉर्डननी अमान्य केल्यानंतर कैदी आपल्या बराकमध्ये दाखल झाले. त्यांनी टीव्ही सुरू केला व अचानकपणे कपाळमोक्ष करून घेतला. स्वत:च कपाळमोक्ष करून घेतल्यानंतर कैद्यांनी वॉर्डननीच आपल्यावर हल्ला केल्याचा बनाव केला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी कारागृहात दाखल झाले आणि बंदोबस्तात उपचारासाठी कैद्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर कारागृहातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.