कारागृहातील कैदीच करताहेत अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल!
गुलबर्गा येथील प्रकाराने खळबळ : वाढत्या गैरकृत्याने कारागृह चर्चेत
बेळगाव : राज्यातील कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे कारागृह विभागाची प्रतिमा डागाळत चालली आहे. मोबाईलचा वापर, हाणामारी आदी घटनांमुळे हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह ठळक चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याच कारागृहात खंडणीसाठी धमकीचा फोन गेल्यानंतर देशभरात हिंडलगा कारागृह चर्चेत असतानाच आता गुलबर्गा कारागृहातून एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. गुलबर्गा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या काही कैद्यांनी कारागृह अधिकाऱ्यांनाच ब्लॅकमेल करायला सुरू केले आहे. बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृह चित्रपट अभिनेता दर्शन व त्याच्या साथीदारांची बडधास्त ठेवल्यामुळे चर्चेत आले होते. त्याआधी परप्पन अग्रहार कारागृहात बसून दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या काही तरुणांनी स्फोटाची योजना तयार केल्याची घटनाही उजेडात आली होती.
सरकारने बंदी घातलेल्या अल उमा संघटनेच्या झुल्फिकार अली नामक एका कैद्याने कारागृहातील अधिकारी व सहकैद्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका कैद्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुलबर्गाचे पोलीस आयुक्त डॉ. एस. डी. शरणप्पा यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. कारागृहावर छापा टाकून मोबाईल व अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बेंगळूर येथील मल्लेश्वरममधील भाजप कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट घडविल्याच्या आरोपावरून झुल्फिकार अलीला अटक झाली आहे. 17 एप्रिल 2013 रोजी हा स्फोट झाला होता. या स्फोटात 11 पोलिसांसह 16 जण जखमी झाले होते. कारागृहातील कैदी अधिकाऱ्यांना लाच देताना मोबाईलमधून चित्रीकरण करून अधिकारी व कैद्यांनाही त्याने ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे.
बारबालांशी व्हिडिओ कॉलवरून संभाषण
उपलब्ध माहितीनुसार झुल्फिकार अली सहकैद्यांना मोबाईल भाड्याने वापरासाठी देत होता. मुंबई येथील बारबालांशी व्हिडिओ कॉलवरून तो कैद्यांबरोबर संभाषण घडवून आणत होता. त्याचे व्हिडिओ बनवून तो कैद्यांनाही ब्लॅकमेल करीत होता. याकामी शिमोगा येथील गुंड बच्चनची त्याला साथ मिळत आहे. गुलबर्गा कारागृहातील 10 हून अधिक अधिकाऱ्यांना त्याने धमकाविले आहे. बेळगाव, बेंगळूर, गुलबर्गा कारागृहातून धमकीचे फोनकॉल वाढले आहेत. कारागृह विभागाचे उत्तर विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनाही कारागृहातून फोन करून धमकावण्यात आले होते. राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात सुरू असलेल्या अशा घटनांमुळे अधिकारी हैराण झाले आहेत.