स्वत:च्या कृत्यामुंळेच तुरुंगामध्ये! अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही त्यांच्या कृत्यामुळेच झाली असल्याची प्रतिक्रिया भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते आण्णा हजारे यांनी दिली आहे. माझं ऐकलं नाही त्यामुळे मला वाईट वाटतं असेही ते म्हणाले. आम आदमी पक्षाचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इडी कडून अटक करण्यात आली. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावर इडीने कारवाई करताना अटक केली.
त्यांच्या अटकेनंतर राजकिय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्राचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते आण्णा हजारे यांनीही प्रतिक्रिया देताना आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "राज्याच्या मद्यधोरणाविषयी मी अरविंद केजरीवालांना दोनवेळा पत्र लिहीले होते. त्यांनी माझं ऐकलं नाही याचं मला वाईट वाटतं. त्यांना झालेली अटक ही त्यांच्या कृत्यांमुळे आहे.अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांना मी नेहमीच देशाच्या हिताचे काम करण्यासाठी सांगितले आहे. पण त्यांनी माझा कानमंत्र लक्षात ठेवला नाही."अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
शेवटी बोलताना त्यांनी "माझ्यासोबत काम करणारे आणि दारूविरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल राज्यात आता मद्य धोरणे तयार करत आहेत. त्यांची अटक हे त्यांच्याच कृत्यामुळे आहे," असा पुनर्उच्चार आण्णा हजारे यांनी केला.