मोटारसायकलवरून पडून प्रभारी मुख्याध्यापकाचा मृत्यू
संतिबस्तवाडनजीक अपघात : संतप्त जमावाकडून रास्तारोको
बेळगाव : मोटारसायकलवरून पडून संतिबस्तवाड येथील ऊर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी संतिबस्तवाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी रास्तारोको केला. जमीलअहमद गुडूसाब तोपिनकट्टी (वय 52) मूळचे राहणार नंदगड, सध्या राहणार अमननगर असे त्या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे. सोमवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास केए 22 एचक्यू 3566 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून संतिबस्तवाडला जाताना ही घटना घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जमीलअहमद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी आपल्या मोटारसायकलवरून ते संतिबस्तवाडला जात होते. त्यावेळी संतिबस्तवाड क्रॉसपासून हाकेच्या अंतरावर मोटारसायकलवरून पडून ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच संतिबस्तवाड ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरून परिवहन मंडळाची बस आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. अरुंद रस्त्यामुळे अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला. या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे रस्ता रुंद करावा, या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी रास्तारोकोही केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून जमीलअहमद यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर पुढील तपास करीत आहेत.