गोकाकच्या प्राचार्याला 40 लाखांचा ऑनलाईन गंडा
बेळगाव : ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक बोनस देऊन लाभ मिळवून देऊ, असे सांगून गोकाक येथील एका प्राचार्याला सुमारे 40 लाख 69 हजार 485 रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवार दि. 9 रोजी जिल्हा सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
गोकाक येथील एका प्राचार्याला @Mirrox_Account_Mngr_bot या टेलिग्राम खात्यावर Mirrox नावाच्या ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक बोनस देऊन लाभ मिळवून देऊ, असे भामट्याने फिर्यादी प्राचार्याला ऑनलाईनद्वारे संपर्क साधून सांगितले. समोरील व्यक्तींवर विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून 1 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ऑनलाईनच्या माध्यमातून सुमारे 40 लाख 69 हजार 485 रुपये वर्ग करून घेतले आहेत. पैसे गुंतवूनदेखील पैसे परत न देण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जिल्हा सीईएन पोलीस स्थानक गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऑनलाईन भामट्याविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.
सध्याची परिस्थिती पाहता ऑनलाईन फसवणुकीत अशिक्षित कमी उच्चशिक्षितच अधिक बळी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे प्रकार घडत आहेत. तसेच गुंतविलेल्या पैशापेक्षा परतावा अधिक देण्यात येईल, असे अमिष दाखविले जात असल्याने धनाढ्या ऑनलाईन भामट्यांच्या गळाला लागत आहेत. पोलीस खात्याकडून ऑनलाईन फसवणुकी संदर्भात सातत्याने जनजागृती केली जात असली तरी अद्यापही नागरिकांमध्ये म्हणावी तशी जागृती झाली नसल्याचे दिसून येते.