महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधान इंटर्नशीप योजना: नव्या संधींची आशा

06:30 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान इंटर्नशिपचा थोडक्यात पण महत्त्वाचा तपशील म्हणजे या योजनेंतर्गत प्रमुख व निवडक अशा 500 कंपन्यांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष असेल. या योजनेमागे सरकारचा मुख्य उद्देश शिक्षित नव युवकांना प्रशिक्षित करून रोजगारक्षम करणे आहे.

Advertisement

यावर्षीच्या केंद्रिय अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून नव्याने उत्तीर्ण झालेल्या पात्रताधारक उमेदवारांना नवागत म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या संदर्भात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नमूद केल्यानुसार देशातील आर्थिक व्यवसाय क्षेत्रातील प्रमुख व प्रथितयश अशा 500 कंपन्यांमध्ये योजनेच्या पहिल्या टप्प्यात इंटर्नशिप योजना अंमलात आणली जाणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश या कंपन्यांना बऱ्याचदा भासणारी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात कमी करणे व त्याचवेळी नव्याने उत्तीर्ण झालेल्या विविध विषय आणि क्षेत्रातील हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या प्रशिक्षणातून सुरुवातीची रोजगार संधी उपलब्ध करून देणे अशा दुहेरी स्वरुपाचा आहे.

Advertisement

योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच टप्प्यात केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या  प्राथमिक अभ्यासानुसार या नव्या इंटर्नशिप योजनेचा फायदा महानगरांपेक्षा तुलनेने मध्यम आकारातील म्हणजेच तृतीय स्तरीय शहरातील कंपन्यांना तुलनेने अधिक होऊ शकतो. अभ्यास अहवालात नमूद केल्यानुसार अशा नागरी व शैक्षणिक, औद्योगिक विकासदृष्ट्या विकसित होणाऱ्या शहरातील विद्यार्थी उमेदवारांना शिक्षणानंतर कौशल्यप्राप्ती व त्याद्वारे रोजगार मिळण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो.

केंद्र सरकारची इंटर्नशीप योजना ही प्रामुख्याने युवक व नव्याने शैक्षणिक पात्रता धारकांसाठी असल्याने देशातील युवा आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती आणि आकडेवारीचा तपशील जाणून घेणे आवश्यक ठरते. यासंदर्भात उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या देशांतर्गत युवकांच्या एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकसंख्या ही 15 ते 29 या वयोगटातील आहे. सद्यस्थितीत या वयोगटातील  निम्मी संख्या ही नव्याने शैक्षणिक पात्रताधारक व रोजगारक्षम आहे. त्यातही यातील बहुसंख्य विद्यार्थी, उमेदवार हे महानगरांच्या तुलनेने छोटी शहरे वा जिल्हास्थाने अथवा औद्योगिक दृष्ट्या विकसित ठिकाणचे रहिवासी आहेत. हेच विद्यार्थी नव्या पंतप्रधान इंटर्नशिप-प्रशिक्षण योजनेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकतात.

पंतप्रधान इंटर्नशिपचा थोडक्यात पण महत्त्वाचा तपशील म्हणजे या योजनेंतर्गत प्रमुख व निवडक अशा 500 कंपन्यांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाईल. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष असेल. या योजनेमागे सरकारचा मुख्य उद्देश शिक्षित नव युवकांना प्रशिक्षित करून रोजगारक्षम करणे आहे. यासाठी 21 ते 24 या वयोगटातील शालांत परीक्षा, तंत्रशिक्षण, पदवी-पदव्युत्तर, चार्टर्ड अकौंटन्सी असे शैक्षणिक पात्रताधारक व अल्प उत्पन्नधारक गटातील उमेदवार अर्ज करण्याची अट होती.

वरील प्रशिक्षण कालावधीत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या एक वर्ष कालावधीसाठी दरमहा 5000 रु. पाठ्यावेतन देय असेल. यापैकी 4500 रु. सरकारतर्फे व 500 रु. संबंधित कंपनीतर्फे देण्यात येतील. याशिवाय वार्षिक 6000 रु. अतिरिक्त खर्चापोटी देण्यात येतील. पंतप्रधान इंटर्नशिपच्या पहिल्या व प्रायोगिक टप्प्यात 2024 मध्ये सुमारे 1 लाख 25 हजार विद्यार्थी-युवकांना समाविष्ट करून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. योजनेला अधिक लवचिक बनविण्यासाठी त्यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असणारी सीएसआर रक्कम या योजनेसाठी वापरण्याचा लवचिक व व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नव्या सवलतीचा लाभ आता संबंधित कंपन्या सहजपणे घेऊ शकतात.

पंतप्रधान इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर त्यानुसार कौशल्य विकास, संबंधित व प्रत्यक्ष कामाचा सराव व काही प्रमाणात पाठ्यावेतन असे विविध लाभ हमखासपणे होणार आहेत. याशिवाय योजनेत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना मिळणारा अनुभव त्यांना संबंधित कंपनीच नव्हे तर इतर उद्योग- व्यवसाय क्षेत्रात करिअर सुरु करण्यासाठी लाभप्रद ठरू शकते.

याशिवाय नव्याने विविध अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या व मध्यम आकारातील शहरांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी रोजगार व स्पर्धेच्या संदर्भात जी संकोच वा प्रसंगी संभ्रमाची भावना असते त्यावर तोडगा म्हणून नवी इंटर्नशीप प्रशिक्षण योजना फायदेशीर ठरू शकेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना रोजगारासाठी निवड मुलाखतीचा सराव व निवड झाल्यावर प्रत्यक्ष कामाची व्यावहारिक माहिती व अनुभव मिळतो. याचा लाभ त्यांना पुढील मुलाखत व अन्यत्र निवडीसाठी होऊ शकतो. उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण काळात उद्योग-व्यवसायाच्या प्रक्रियेपासून संगणकीय कार्य पद्धतीपर्यंतच्या विविध कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष सराव मिळू शकतो.

तसे पाहता प्रशिक्षणासाठी इंटर्नशिप पद्धतीचा वापर आपल्याकडे नवीन नाही. त्याचा अवलंब मुख्यत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून बहुदा सर्वच प्रमुख संस्था वा विद्यापीठ स्तरावर केला जातो. त्याद्वारे अशा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्यात काही आठवड्यांच्या माहिती व सरावासाठी उद्योग-व्यवसायात काम करणे आवश्यक ठरते. पदव्युत्तर वा तंत्र-शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमात तर विद्यार्थ्यांना त्यांच्या या अल्पकालीन प्रशिक्षण कालावधीत माहितीशास्त्र, संगणक तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, मुलभूत व्यवस्थापन या क्षेत्राची मुलभूत माहिती देण्याचे महत्त्वपूर्ण काम होणार आहे.

कंपनी व्यवस्थापनांच्या संदर्भात सांगायचे म्हणजे कंपन्यांना त्यांच्या नव्या व वाढत्या व्यावसायिक गरजा लक्षात घेता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता नेहमीच असते. विशेषत: अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी  कंपन्यांचे प्रयत्न सुरुच असतात. विविध अभ्यासक्रमांसह उत्तीर्ण होणाऱ्या नव्या व पात्रताधारक उमेदवारांना कंपन्या प्रशिक्षणाच्या संधी देत असतात. प्रसंगी त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना पाठ्यावेतनापासून प्रशिक्षणापर्यंत तरतूद करतात. कंपन्यांच्या याच प्रयत्नांना आता पंतप्रधान इंटर्नशीप योजनेद्वारा मर्यादित स्वरुपात का होईना चालना मिळणार आहे.

पंतप्रधान इंटर्नशीप योजना व या योजनेची अंमलबजावणी म्हणजे मूलत: 2020 च्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मोठा व महत्त्वपूर्ण टप्पा म्हणायला हवा. या धोरणांतर्गत केंद्र सरकारने कौशल्यावर आधारित शिक्षणाद्वारे प्रशिक्षित युवा वर्ग व उद्योग व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याच निर्णयाची नियोजनपूर्ण व वेळेत अंमलबजावणी यानिमित्ताने होत आहे हे महत्त्वाचे.

जाणकारांच्या मते प्रचलित परिस्थितीत शैक्षणिकदृष्ट्या विविध क्षेत्रातील पात्रताधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता असूनसुद्धा केवळ अनुभव नाही या चाकोरीबद्ध मानसिकतेमुळे  नोकरी, रोजगार मिळण्यास नेहमीचीच अडचण येते व नोकरीची सुरुवातच न झाल्याने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेला रोजगार न मिळण्याच्या मर्यादा मोठ्या प्रमाणावर येतात. प्रचलित शिक्षण, रोजगार क्षेत्राशी असणाऱ्या मर्यादांना काही प्रमाणात छेद देण्याचे कामसुद्धा पंतप्रधान प्रशिक्षण योजनेद्वारा आता नव्याने होणार आहे.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article