पंतप्रधानांची जवानांबरोबरची दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वार्षिक परंपरेप्रमाणे यंदाही सैनिकांबरोबर आपली दिवाळी साजरी केली. खरं म्हणजे पंतप्रधान स्वत: कधी दिवाळी साजरी करत नाहीत कारण जे सैनिक आपल्या देशासाठी फार मोठा त्याग करतात, त्यांच्याबरोबर काही क्षण एकत्रित राहण्यामध्ये पंतप्रधानांना फार आनंद आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी प्रथमच पंतप्रधान झाले आणि त्यांनी सियाचिनमध्ये सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. 2015 मध्ये पाकिस्तानच्या सीमेवर आपल्या भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. दिवाळी साजरी करण्याची त्यांची संकल्पना ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि हे नाटक नसून, प्रत्यक्ष या देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी ही सैनिक मंडळी अतिशय खडतर जीवन जगत असतात आणि त्यांनी आयुष्यात कधी विचार देखील केला नसेल की, देशाचा मोठा, सर्वश्रेष्ठ असा नेता आपल्याबरोबर काही क्षण एकत्रित राहणार आणि खुद्द पंतप्रधानांनी स्वत:च्या हाताने कच्छच्या सैनिकांना गुऊवारी मिठाई भरविली. या मिठाईने सैनिकांचे केवळ पोटच भरून आले असे नाही तर हृदयदेखील भरून आले आणि आयुष्यातील खरी दिवाळी ही पंतप्रधान मोदींसोबत, ही भावना त्यांच्यामध्ये कायम राहील. एवढेच नव्हे तर मोदींनी अशा पद्धतीची दिवाळी साजरी करून सैनिकांमध्ये आत्मविश्वास अधिक मजबूत केला. आज सैनिकांना जे आवश्यक आहे, ते म्हणजे प्रोत्साहन आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याची कला ही पंतप्रधान मोदींमध्ये निश्चितच आहे. त्यामुळेच 2016 मध्ये देखील हिमाचल प्रदेशमध्ये जिथे प्रचंड थंडी आणि त्यामध्ये रक्त गोठून जाईल एवढा हिवाळा, अशा परिस्थितीमध्ये देखील आपले सैनिक या देशाच्या रक्षणासाठी उभे असतात. 2017 मध्ये जम्मू-काश्मीरमधील बांधीपोरा येथे सैनिकांशी त्यांनी संवाद साधला होता. अर्थात पंतप्रधान हे स्वत: तिथे गेले होते. 18 मध्ये उत्तर काशी, 19 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 21 मध्ये जम्मू काश्मीरचे नौशेरा सेक्टर, 2022 मध्ये कारगिल, 2023 मध्ये हिमाचलमधील लेपच्या आणि 2024 मध्ये मोदींनी गुजरातमधील कच्छ या वाळवंटी प्रदेशात आपले सैनिक जे दिवस-रात्र भारताच्या सीमेवर राहून या देशाचे रक्षण करतात, अशा सैनिकांबरोबर मोदींनी आपली दिवाळी साजरी केली. आपली अर्थव्यवस्था ही आपली ताकद असली तरीदेखील आपल्या देशाची खरी ताकद ही आपले सैनिक, आपले जवान, हे आहेत कारण ही माणसे आपल्या देशाचे रक्षण करतात म्हणून आपण आज या देशात सर्वाधिक उत्पादन घेऊ शकतो आणि उत्पन्न तयार करू शकतो आणि त्यामुळेच आपली अर्थव्यवस्थाही मजबूत होत असते. दिवाळीच्या निमित्ताने का असेना परंतु सैनिकांबरोबर राहणे, त्यांच्याबरोबर गप्पा-गोष्टी करणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि अर्थात त्यांच्याबरोबर फराळ करणे, यातून एक प्रकारच्या विश्वासाचे नाते निर्माण होत असते आणि पंतप्रधानांनी नेमके हे साधलेले आहे. मोदींनी पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे व ती म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही. आपल्या देशातील वीर जवान आणि आपले सैनिक ही आपली खरी ताकद आहे आणि त्यामुळे आपल्या देशावर वक्रदृष्टी करण्याचा जरा देखील मनात विचार शत्रू राष्ट्र करू शकणार नाही, एवढा आत्मविश्वास पंतप्रधानांना वाटतो आणि आपल्या मनातील सारे विचार हे त्यांनी देशवासीयांसमोर मांडलेले आहेत. भारताने संरक्षण क्षेत्रात आज गऊडभरारी मारलेली आहे आणि आपल्याकडे आज एवढी मोठी शस्त्रसामुग्री आहे की, आता बरीचशी शस्त्र आपल्याला तयार करता येऊ लागली आहेत. एवढेच नव्हे तर एक काळ असा होता की, आपल्याला जास्तीत जास्त शस्त्रास्त्र ही विदेशातून खरेदी करावी लागत होती परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भारतात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्मिती होते आणि भारत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs निर्यात करतो. यातून अनेकांना रोजगार संधी प्राप्त होते आणि अनेक देशांना भारतातून शस्त्रास्त्रs खरेदी करण्याची गरज पडते. या देशाचे महत्त्व त्यातूनही बरेच वाढत असते. भारत जागतिक स्तरावर एक महाशक्ती बनवून राहावा, हे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्मिती व्हावी, या उद्देशाने उचललेली प्रत्येक पाऊले महत्त्वाची ठरली आहेत. आज भारतात उत्कृष्ट दर्जाच्या पाणबुड्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. देश आज संरक्षण क्षेत्रात अत्यंत मजबूत बनलेला आहे आणि जगामध्ये सर्वाधिक युवाशक्तीची ताकद ही भारतातच आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि देशाचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांशी अत्यंत ओतप्रोत अशा पद्धतीचे भावनिक व प्रेमाचे नाते जोडलेले आहे. ज्या राष्ट्राकडे अत्यंत मजबूत संरक्षण व्यवस्था असेल, त्या राष्ट्राबद्दल शेजारी राष्ट्रांमध्ये नेहमीच भीती निर्माण होत असते. भारताच्या शेजारी असलेल्या बहुतांश राष्ट्रांना भारताबद्दल भीती आहे. जागतिक पातळीवर आक्रमक असणाऱ्या चीनलादेखील भारताची भीती हमखास वाटते, मात्र चीनचे एकंदरीत वागणे हे नेहमीच संशयास्पद आहे आणि त्यामुळे या देशावर जागतिक पातळीवर कोण विश्वास ठेवत नसतो. भारत कधीही चीनवर विश्वासून राहणार नाही. त्यामुळेच चीनकडून आपण जे काही निर्यात करीत होतो, आज ती वेळ राहिलेली नाही. भारताने मोठ्या प्रमाणात चीनची नांगी मोडून टाकण्यासाठी चीनकडून आयात करण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवले आहे आणि त्यामुळे चीनच्या बाजारपेठेला खरा जर मार बसला असेल तर तो भारतामुळे. भारत एक समृद्ध देश आहे आणि या देशाकडे प्रचंड ताकद आहे आणि क्षमतादेखील आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांमध्ये भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर राष्ट्रांमध्ये बदललेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करून ठेवला आहे आणि आपल्या या देशातील अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या विविध धोरणाद्वारे पंतप्रधान मोदी यांनी जी ताकद निर्माण केली, त्यातूनच हा देश जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताची ताकद काय आहे, हे आज चीनसारख्या राष्ट्रांनादेखील कळून चुकलेले आहे. भारताची जमीन गिळंकृत करण्याचे त्यांचे कारस्थान मोदींनी बंद केले आहे. जवानांसोबत दिवाळी साजरी करताना त्यातील गोडी ही अत्यंत अविट आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी जे वर्णन केलेले आहे, त्यातून भारतीय जवानांमध्ये उत्साह निर्माण होईल. मोदींचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि यामुळे जवानांमध्ये असलेले देशप्रेम आणखीन दृढ होऊन जाईल.