ज्येष्ठांना आरोग्य विमा देण्याचा पंतप्रधानांचा निर्णय ऐतिहासिक
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख ऊपयांचा आरोग्य विमा देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, गोव्यासह देशातील तमाम ज्येष्ठांनी त्याचा लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात सर्व हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख ऊपयांच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर गोव्याशेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नसल्याने तेथील गरजू लोकांना देखील गोव्यात येऊन या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत 70 वर्षांवरील नागरिकांना कोणी विमा देत नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच हा निर्णय घेऊन ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिल्याने त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.