For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांचे आज संबोधन

04:05 PM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांचे आज संबोधन
Advertisement

साठ हजारांची उपस्थिती अपेक्षीत : दक्षिणेतील सभा ऐतिहासिक ठरणार,एक हजार पोलिसांचे बळ तैनात

Advertisement

वास्को : आज शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी दक्षिण गोवा सज्ज झाला आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गेले काही दिवस भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते झटत आहेत. सुरक्षा यंत्रणेनेही पूर्ण सज्जता ठेवलेली असून जवळपास एक हजार पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. अंतिम टप्प्यातील पूर्वतयारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. मुरगाव तालुक्याबरोबरच दक्षिण गोव्यातील ही ऐतिहासिक सभा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुरगाव तालुक्यातील सांकवाळ पठारावर आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेसाठी जवळपास साठ हजारांच्या संख्येने लोक उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे. तशी सर्व सज्जता भाजपाने ठेवली आहे. या सभेला केवळ दक्षिण गोव्यातील लोक अपेक्षित असून मुरगावपासून काणकोणपर्यंतच्या लोकांच्या प्रवासी सोय भाजपाने केलेली आहे. या सभेच्या निमित्ताने मुरगाव तालुक्यातील सांकवाळच्या पठाराकडे दक्षिण गोव्याचे लक्ष केंद्रीत झालेले आहे.

मुरगाव तालुक्यावर अधिक भर

Advertisement

पंतप्रधानांच्या सभेच्या उपस्थितीसाठी भाजपाने मुरगाव तालुक्यावर अधिक भर दिलेला आहे. वास्को, दाबोळी, मुरगाव या तिन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तसेच कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास हेसुध्दा भाजपाचेच सहकारी असल्याने सर्वाधिक संख्या मुरगाव तालुक्याची असेल असे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. आमदार संकल्प आमोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर शंभर बसमधून नागररिकांना आणण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे या सभेला मुरगाव मतदारसंघातील लोकांची उपस्थिती अधिक ठरण्याची शक्यता आहे. मुरगाव तालुक्यासह दक्षिण गोव्यातील ही ऐतिहासिक जाहीर सभा ठरणार आहे. सभेच्या तयारीत गेल्या काही दिवसांपासून दाबोळीचे आमदार तसेच मंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व्यस्त आहेत. गुरूवारी पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांनी सभेच्या पूर्वतयारीचे पाहणी केली व समाधानही व्यक्त केले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासह पक्षाचे काही नेते व स्थानिक कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी उपस्थित होते.

पंतप्रधानांचे थेट सभास्थानी आगमन

जाहीर सभेला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास सुरवात होईल. सहाच्या सुमारास दाबोळी विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट सभास्थानी आगमन होईल. या सभेला केंद्रीयमंत्री व लोकसभेचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपाचे केंद्रीय पदाधिकारी बी.एल. संतोष, आशिष सूद राज्यातील इतर मंत्री व आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतील.

रात्री साडेनऊपर्यंत वाहतुकीवर निर्बंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर रस्तामार्गे थेट सभास्थानी येणार असल्याने जवळपास दोन किलो मिटर अंतराचा असलेल्या या अंतरावर कडक सुरक्षा असणार आहे. पंतप्रधानांचे आगमन आणि निर्गमनाच्या वेळी दाबोळी विमानतळ ते वेर्णापर्यंतच्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडीत राहणार आहे. तसेच दुपारी तीन ते रात्री साडेनऊपर्यंत या मार्गावरील प्रवासी वाहतूक व इतर अवजड वाहतूक रोखण्यात येईल. त्या मार्गाच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी काही प्रमाणात सूट असेल. वेर्णा ते दाबोळीपर्यंची वाहतूक कुठ्ठाळी चिखलीमार्गे वळवण्यात येणार आहे. रात्री साडे नऊपर्यंत हे निर्बंध असतील. वाहतूक नियंत्रणासाठी तिनशे पोलीस रस्त्यांवर तैनात असतील तर इतर सुरक्षा व्यवस्थेसाठी मिळून जवळपास हजार पोलिसांचे बळ पंतप्रधानांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने ठिकठिकाणी तैनात असणार आहे.

 चोख पार्किंग व्यवस्था

वाहतूक पोलीस विभागाने मोठ्या संख्येने सभेसाठी येणाऱ्या वाहनांची चोख पार्किंग व्यवस्था केलेली आहे. वास्को, मुरगाव दाबोळी, झुआरीनगर अशा भागातून येणारी वाहने सांकवाळ औद्योगिक वसाहतीत पार्क केली जातील. याच ठिकाणी व्हीआयपी व व्हीव्हीआयपींच्या वाहनांची वेगळी सोय असेल. तसेच सांकवाळच्या मेटास्ट्रीप कंपनीजवळ दक्षिण गोव्यातील बसगाड्या व इतर वाहनांची सोय करण्यात आलेली आहे. सभेच्या जवळच पाठीमागच्या भागात एका खासगी जमीनीवरही वाहनांच्या पार्किंग सोय करण्यात आलेली आहे अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रानी दिली. सभेच्या ठिकाणी लोकांना सोडून ही वाहने आपापल्या पार्पिगच्या जागी निघून जातील. व सभा संपल्यानंतर सभेच्या ठिकाणी या बसगाड्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येतील.

Advertisement
Tags :

.