इम्रान खान गटाकडूनही पंतप्रधानपदाचा उमेदवार
ओमर अयुब यांच्या नावाची घोषणा : नवाझ शरीफही सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफने पक्षाचे सरचिटणीस उमर अयुब यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. उमर अयुब हे ‘पीटीआय’चे उमेदवार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत इम्रान खान समर्थित अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक 101 जागा मिळाल्या आहेत, परंतु सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना कोणत्याही पक्षासोबत युती करणे आवश्यक आहे. नियमांनुसार केवळ कोणताही राजकीय पक्षच सरकार बनवू शकतो, अपक्ष आमदार एकत्र सरकार बनवू शकत नाहीत. एकापेक्षा जास्त पक्ष मिळून सरकार बनवू शकतात. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी अपक्ष आमदारांना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा भाग बनवावे लागेल.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हेही सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत. ते पाकिस्तान पीपल्स पार्टीसोबत युतीचे सरकार बनवू शकतात, मात्र त्यासाठी त्यांना काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागेल. अनेक दिवसांपासून ते यासाठी प्रयत्न करत होते, मात्र आजतागायत त्यांना त्यात यश आलेले नाही. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वत:चे बंधू शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे. तर मुलगी मरियम यांना पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित केल्याची माहिती पीएमएल-एन या पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी बुधवारी दिली होती.
कोण आहे उमर अयुब?
उमर अयुब हे पाकिस्तानातील प्रसिद्ध अयुब खान कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा जनरल मोहम्मद अय्याब खान हे पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचे वडीलही देशातील मोठे राजकारणी राहिले आहेत. 26 जानेवारी 1970 रोजी जन्मलेले उमर अयुब पाकिस्तानच्या राजकारणातही दीर्घकाळ सक्रिय होते. उमर अयुब यांचे वडील दीर्घकाळ खासदार होते आणि अनेक खात्यांचे मंत्री होते. उमर यांचे प्रारंभीचे शिक्षण पाकिस्तानातील एका मोठ्या शाळेत झाल्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षात प्रवेश केला. अयुब यांनी इम्रान सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी अर्थ मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली होती.