For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

06:22 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांनी घेतले रामलल्लाचे दर्शन
Advertisement

अयोध्या दौऱ्यातील रोड शोमध्ये समर्थकांची तोबा गर्दी

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी अयोध्येत पोहोचले. यावषी जानेवारीत रामजन्मभूमी मंदिरात भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी रविवारी पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी सुरुवातीला रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर भव्य रोडो शो केला. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

Advertisement

पंतप्रधान मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दररोज ते देशाच्या विविध भागात रोड शो आणि निवडणूक प्रचारसभांना संबोधित करत आहेत. याचदरम्यान रविवारी म्हणजेच 5 मे रोजी ते अयोध्येत पोहोचले. सुरुवातीला त्यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात दंडवत प्रणाम केला. तसेच रामदर्शनानंतर त्यांनी रोड शो केला. याप्रसंगी त्यांना पाहण्यासाठी आणि स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अयोध्येत 20 मे रोजी मतदान होणार आहे.

समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यात प्रचारसभा

अयोध्येत जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील इटावा येथे एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित केले. या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीकेची झोड उठवली. मोदी असतील किंवा नसतील, पण देश सदैव राहणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच काँग्रेस आणि समाजवादी पक्ष काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत स्वत:च्या आणि वारसदारांच्या भविष्यासाठी निवडणूक लढवत असल्याचा चिमटा पंतप्रधानांनी काँग्रेस आणि सपाला उद्देशून काढला.

अयोध्येत जय्यत तयारी

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच अयोध्येला येत असल्यामुळे शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरातही फुलांची आरास आणि विद्युत रोषणाई केली होती. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने मुख्य दरवाजापासून गर्भगृहापर्यंत सजावट करण्यात आल्याचे मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.