पंतप्रधान नरेंद्र मोदींची राष्ट्रपतींशी भेट-चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती भवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पंतप्रधान-राष्ट्रपती यांच्यातील भेटीचे छायाचित्र पोस्ट करत यासंबंधीची माहिती सर्वदूर केली. छायाचित्र व्हायरल होताच वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात होते. तथापि, चीनमध्ये झालेल्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींसोबतची भेट झाल्याचे समजते. साधारणत: पंतप्रधान भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्याही जागतिक व्यासपीठावर पोहोचतात तेव्हा ते तेथून परतल्यानंतर राष्ट्रपतींना त्याबद्दल माहिती देतात. याशिवाय, शनिवारी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला. या संवादामध्ये दोन्ही नेत्यांनी युक्रेन संघर्ष लवकरच संपवण्याच्या प्रयत्नांवर विचार विनिमय केला. या दरम्यान, भारत-फ्रान्समधील द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचाही सकारात्मक आढावा घेण्यात आला.