पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पणजीतील स्वच्छतेचे कौतुक
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने गोव्याची राजधानी पणजी शहराचा उल्लेख करुन कौतुक केले. पणजी शहरात कचऱ्याची 16 ठिकाणी विभागणी होते आणि त्यात महिलावर्गाचे काम मोठे आहे, असेही मोदी यांनी नमूद केले. त्यामुळेच पणजी शहराला स्वच्छतेचा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याचे ते म्हणाले.
काल रविवारी पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ हा उपक्रम रेडिओवरुन सादर करण्यात आला. त्यांनी त्यात स्वच्छतेवर भर दिला. हे काम दरदिवशी केले तरच राज्य, देश स्वच्छ होणार असे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाशी संवाद साधताना त्यांनी पणजी शहरातील स्वच्छतेचे उदाहरण दिले आणि गोवा सरकारची स्तुती केली. स्वच्छता कधीतरी करण्याची गोष्ट नाही. ती प्रतिदिन नियमितपणे केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गोव्यासह त्यांनी भोपाळ तसेच छतीसगडमधील महिलांच्या सफाई कामाचे कौतुक केले.
मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात राजधानी पणजीसह गोव्याचा उल्लेख केला म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून पणजी शहराचे उदाहरण देशासमोर ठेवले म्हणून मोदी यांचे आभार मानले आहेत. पणजी शहराला राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छता पुरस्कार लाभला ही गोष्ट गोव्यासाठी अभिमानास्पद असून त्याचा चांगला परिणाम होऊन स्वच्छतेसाठी उत्तेजन मिळेल, अशी आशा डॉ. सावंत यांनी वर्तवली आहे.